आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरूणराजाचे मराठवाड्यात मुसळधार सरींनी आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मान्सूनने गुरुवारी मराठवाड्यात प्रवेश केला. कोकण किनारपट्टी ओलांडल्यानंतर रेंगाळलेल्या पावसाच्या वाटचालीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती; परंतु गुरुवारी मान्सून मध्य महाराष्ट्र व्यापून मराठवाड्यात आला. परभणीपर्यंत पोचलेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या हवामानस्थिती अनुकूल आहे.


जोरदार पावसाची शक्यता : येत्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात मुसळधार पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, रायगड जिल्ह्यांत गडगडाटात जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साता-याच्या काही भागापर्यंत पोचलेल्या मान्सूनने गुरुवारी पुण्याला वळसा घालत मराठवाड्याच्या दिशेने ही आगेकूच केली आहे.

पुढे परभणीपर्यंत गेलेला मान्सून अद्याप पुणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात पोचलेला नाही.
‘‘दक्षिण महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. मध्यप्रदेशच्या पूर्व भागापासून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणापर्यंतच्या हवेचा दाबही कमी झाला आहे. यामुळे मान्सूनची आगेकूच मराठवाड्याच्या दिशेने होण्यास चालना मिळाली. येत्या 48 तासात मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापून उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करण्याची सुचिन्हे आहेत,’’ असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.


यंदा सुरवात चांगली
दुष्काळी ठरलेल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हाच पाऊस गेल्यावर्षी 5 जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. आर्श्चयकारकरित्या जोरदार मुसंडी मारत अवघ्या 24 तासांनी म्हणजेच ६ जूनला मॉन्सून कोकण किनारपट्टीवर आला. त्यानंतर मात्र दहा दिवस पुढे सरकला नव्हता. 17 जूनच्या सुमारास मान्सून मराठवाड्यात पोचला. महाराष्ट्र व्यापण्यासाठी गेल्यावर्षी पावसाला 20 जूनचा दिवस उजाडावा लागला होता. यंदा 6 जूनलाच मान्सून मराठवाड्यात पोचला आहे.


औरंगाबाद-जालन्याला चकवा
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतच मान्सून पोहचला आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप तो आलेला नाही, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले.