आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये मान्सूनचे ३० मे रोजी आगमन, हवामान खात्याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यंदा केरळच्या किनाऱ्यावर नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे दोन दिवस आधी म्हणजे ३० मे रोजीच आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. दरवर्षी साधारणत: १ जून रोजी केरळ किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन होते.

अंदमान-निकोबारच्या समुद्रातून आगेकूच करत मान्सून केरळात येत असतो. या समुद्रात वीस मेच्या सुमारास मान्सूनचा पाऊस सुरू होणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांत बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या समुद्रातील पाऊस वाढला आहे. विषुववृत्तावरून येणाऱ्या फ्लोमध्ये वाढ झाली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी ही स्थिती अनुकूल असून येत्या ३-४ दिवसांत अंदमानच्या समुद्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल, असे भारतीय हवामान
खात्याने म्हटले आहे.

पर्जन्यमानाशी संबंध नाही
>मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज असला तरी पावसाळा चांगला की वाईट याच्याशी त्याचा संबंध जोडता येत नसतो, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

>केरळात आल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात कधी येईल, हे त्या वेळी निर्माण होणाऱ्या हवामानस्थितीवर अवलंबून असते. त्याचे भाकीत आताच वर्तवता येणार नाही, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

वादळी पावसाचा अंदाज
दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्याच्या काही भागातील तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अंशत: घट झाली आहे.