आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon Covered Whole Maharashtra; Met Department

मान्सूनने व्यापला महाराष्ट्र; हवामान विभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यात वेळेवर दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वा-यांनी रविवारी राज्याचा बहुतांश भाग व्यापल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. ढगांच्या वाटचालीसाठी हवामानस्थिती अनुकूल असल्याने दोन दिवसांत राज्यभरात मान्सून पोचल्याचे चित्र पाहायला मिळू शकते. दरम्यान, रविवारी दमदार पावसाने मुंबई-ठाणे भागाला झोडपले. पश्चिम महाराष्‍ट्र तसेच कोकणातही चांगला पाऊस सुरू असून कोकणात दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता पाहता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तर विदर्भातही हलक्या सरी पडल्या आहेत.


येत्या 48 तासांत विदर्भ तसेच कोकणात अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


चाकरमान्यांची सुटी मुंबईत घरीच
मुंबई व उपनगरात रविवारी सकाळपासूनच पावसाने दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने चाकरमान्यांना रविवारची सुटी घरीच घालवावी लागली. तरुणाईने सुटी एन्जॉय करत आनंद लुटला. जागोजाग पाणी साचल्याने महापालिकेची तारांबळ उडाली.


कोकणातही दमदार हजेरी
कोकणातही पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही घरांची पडझड झाली. रायगड जिल्ह्यातील मुरूड, जंजिरा या भागात पावसाची संततधार कायम आहे.


पैठण, खुलताबादेत जोरदार
खुलताबाद, पैठण, गंगापूर, फुलंब्री तसेच कन्नडसह औरंगाबाद तालुक्यात रविवारी चांगला पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यात शेतांत पाणी साचले. बिडकीनामध्ये नद्या-नाले ओसंडून वाहिले.


मराठवाड्यात...
० मराठवाड्यात औरंगाबाद व जालना वगळता उर्वरित भागात पावसाने रविवारी विश्रांती घेतली. बीड, लातूर, उस्मानाबाद भागात ढगाळ वातावरण होते. मात्र, मोठा पाऊस झाला नाही. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मात्र दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
०जालना जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी पाऊस पडला. शहरात दुपारी 3 पासून उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती. अंबड तालुक्यात 2 तास, मंठा तालुक्यात तासभर पाऊस होता. बदनापूर, भोकरदन, घनसावंगी जाफराबादमध्येही पावसाने हजेरी लावली.