आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मान्सून\'चा अंदाज; उन्हाळ्याचा कडाकाच नसल्याने पाऊस मंदावण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा भारतात किती बरसणार याबद्दल हवामान शास्त्रज्ञांमध्ये मतांतरे आहेत. याचे कारण म्हणजे १४ महिन्यांपासून देशात कुठे ना कुठे सुरू असलेला पाऊस व गारपीट. दुसरीकडे एप्रिलचा दुसरा पंधरवडा उजाडला तरी उन्हाळ्याचा कडाका जाणवत नसल्याने मान्सून मंदावणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अल-निनोचे सावट
प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेजवळ तयार होणाऱ्या अल-निनो या उष्ण सागरी प्रवाहांच्या प्रभावाबद्दलही हवामान तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. सन १९५० नंतर भारतात पडलेल्या १३ दुष्काळी वर्षांपैकी दहा वर्षांतील मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव होता. अल-निनोच्या प्रभावाने नजीकच्या भूतकाळातील १९९७ आणि २००९ ही दोन वर्षे भारतासाठी दुष्काळी ठरली. यंदाच्या मान्सूनवरही अल-निनोची छाया आहे. अमेरिकेतील संस्थांनुसार भारतात अल-निनोचा प्रभाव पडण्याची यंदा ७० टक्के शक्यता असून ऑस्ट्रेलियातील हवामान संस्थांचाही यास दुजोरा आहे. हा अंदाज खरा ठरल्यास जून आणि सप्टेंबरमधले भारतातले पाऊसमान कमी होऊ शकते. जागतिक हवामानशास्त्र संघटनेने मात्र मे महिन्यात पॅसिफिकमधल्या प्रवाहांच्या तापमानात लक्षणीय वाढ संभवत नसल्याचे म्हटले आहे. मान्सून केरळात येण्याची सरासरी तारीख १ जून आहे. त्यानंतर गोवा, सिंधुदुर्गातून मान्सून महाराष्ट्रात येतो. गेल्या पाच वर्षांतील मान्सूनच्या आगमनाचा मागोवा घेतल्यास मान्सून आगमनाची तारीख आणि पाऊसमान याचा परस्पर संबंध नसल्याचे दिसते.

पाच निरीक्षणे
मान्सूनचा पाऊस ही विस्तृत आणि दीर्घकाळ चालणारी हवामानप्रक्रिया आहे. त्यासाठी उत्तर-दक्षिण गोलार्धातील विविध स्थानांवरचा हवेचा दाब, वाऱ्यांचा वेग-दिशा, बाष्प, आर्दता, तापमान यांची निरीक्षणे वर्षभर नोंदवली जातात. पावसाचा अंदाज बांधण्यासाठी पाच निरीक्षणे प्रामुख्याने घेतली जातात.
1. उत्तर अटलांटिक आणि उत्तर पॅसिफिक भूपृष्ठाचे डिसेंबर-जानेवारीतले तापमान.
2. दक्षिण हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठाचे फेब्रुवारी-मार्चमधले तापमान.
3. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पूर्व आशियातील समुद्रावर असणारा हवेचा दाब.
4. वायव्य युरोपातील भूभागावरील जानेवारीतील हवेचे तापमान.
5. भूमध्यरेखीय पॅसिफिक महासागरात फेब्रुवारी-मार्चमध्ये असणारे उष्ण प्रवाहांचे प्रमाण.
मान्सूनला खीळ शक्य
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा परिणाम होण्याची चिंता वाटते. गारपिटीमुळे "हिटिंग' नाही. हीच स्थिती कायम राहिली तर मान्सूनचे आगमन व प्रवास याला खीळ बसेल, असे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले.
अनेक घटकांचा परिणाम
यंदा मार्चमधील पाऊस असाधारण आहे. केवळ उन्हाळा नव्हे, इतर अनेक घटक परिणामकारक ठरतात. त्यामुळे मान्सूनवर परिणाम होईलच, असे मानण्याचे कारण नाही, असे पीसीएस. राव (आयएमडी संचालक पुणे) म्हणाले.