आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Leaders Wish To Contest Against Sharad Pawar, Shinde, Ekanath Khadse Claim

शरद पवार, शिंदेंविरुद्ध लढण्यास इच्छुकांची गर्दी,एकनाथ खडसेंचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पश्चिम महाराष्ट्रात यंदा महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे या ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध लढण्यासाठीसुद्धा मोठ्या संख्येने इच्छुक तयार आहेत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पुण्यात केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
वास्तविक पश्चिम महाराष्ट्र हा कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या भागातील चार जिल्ह्यांतील एकही जागा सध्या भाजप-शिवसेनेच्या खात्यात नाही. यंदा मात्र महायुतीने या भागात जोर लावला आहे. खडसे म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या बारामतीतून किंवा सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी पूर्वी कोणीच समोर येत नसे. आता परिस्थिती बदलली असून इच्छुकांमधून निवड करण्याची वेळ आलीय. या जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास वाटतो आहे. आमच्या शिफारशींचा मतदारसंघनिहाय अहवाल पक्षाच्या संसदीय मंडळापुढे ठेवला जाईल. उमेदवारीसाठी रस्सीखेच असली तरी पक्षादेश अंतिम मानण्याची इच्छा सर्वच इच्छुकांनी बोलून दाखवली. मोदींना पंतप्रधान करण्याची सर्वांची भूमिका आहे,’ असे खडसे यांनी स्पष्ट केले.
माढा, बारामतीचा निर्णय नंतर
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या समितीने नगर जिल्ह्यातील तर खडसे यांनी पुणे, माढा, बारामती, सोलापूर आणि सांगली या पाच जागांसाठीच्या इच्छुकांशी चर्चा केली. मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, सुजितसिंह ठाकूर, सुनिल कर्जतकर आदी यावेळी उपस्थित होते. बारामती आणि माढा या जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितल्याने या दोन्हीचा निर्णय नंतर घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
खडसे म्हणाले...
* पश्चिम महाराष्ट्रातील ‘राष्ट्रवादी’चे दोन माजी आमदार मला भेटून गेले. ते भाजपमध्ये येऊ इच्छितात.
* गेल्या वीस वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे चार-पाच खासदार निवडून येत आहेत. विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस केली आहे.
* वरिष्ठांना लोकसभेत पाठवण्याचे आमचे धोरण नाही. परंतु गिरीश बापट, संभाजीराव पवार, प्रकाश शेंडगे, सुरेश खाडे, नाना पटोले आदी विद्यमान आमदारांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शुक्रवारी उमेदवारी निश्चित
‘राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला मुंबईत पक्षाच्या संसदीय मंडळापुढे विभागनिहाय अहवालांची चर्चा होऊन उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होईल. मित्रपक्षांना सोडण्याच्या जागांबद्दलची स्वतंत्र चर्चा होईल. फेब्रुवारीअखेरपर्यंत भाजपच्या सर्व उमेदवारांची घोषणा दिल्लीतून होईल.’ - एकनाथ खडसे