आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Reservation News In Marathi, Latest News

मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "महाराष्ट्राच्या विधिमंडळातील दोन्ही सदनांनी मंजूर केलेला मराठा आरक्षणाचा कायदा कोर्टाच्या पायरीवरदेखील शाबूत राहील. विधिमंडळ आणि न्यायालय या दोघांनाही राज्यघटनेने समान दर्जा दिला असल्याने न्यायालयालादेखील आमच्या निर्णयाचा सन्मान राखावा लागेल,' असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

निष्णात कायदेपंडितांशी सल्लामसलत करूनच मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. विधिमंडळातील काही जणांचा विरोध असतानाही सरकारने मोठ्या चतुराईने कायद्याला दोन्ही सदनांची मंजुरी मिळवली. यालाही कोर्टात आव्हान देऊन खोळंबा करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी करू; मात्र मराठ्यांचे आरक्षण टिकवून ठेवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. "शिवसंग्राम'तर्फे सोमवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तरुणांनी या वेळी प्रचंड गर्दी केली होती. सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार भारती लव्हेकर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी सांगितले, "काँग्रेस आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या नावावर समाजाला खेळवण्याचा प्रयत्न केला. अरबी समुद्रात शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्याचे स्वप्न दाखवत पूर्वीच्या सरकारने तीन निवडणुका काढल्या. आमच्या सरकारने मात्र सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा कायदा केला. अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल."
मेटेंची "फडणवीस' स्तुती
"पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, अजित पवार ही सगळी "आमची'च मंडळी पूर्वी सत्तेत होती; पण यातले कोणीच कामाचे नव्हते. देवेंद्रजी तेवढे कामाचे निघाले. ब्राह्मण मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देणार नसल्याचा अपप्रचार सुरू झाला होता. मात्र, देवेंद्रजींनी मराठा समाजाचे भाऊ म्हणून आरक्षणाचा कायदा करण्याचे अभूतपूर्व काम करून दाखवले. यशवंतराव चव्हाणांच्या रांगेत बसणारे हे मु्ख्यमंत्री आहेत,' अशी स्तुतिसुमने मेटे यांनी उधळली. आम्हाला सोबत घेतल्याशिवाय ते राहणार नाहीत, या शब्दांत त्यांनी स्वतःची इच्छा प्रदर्शित केली.

मुख्यमंत्र्यांची गुगल
विनायक मेटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मेटे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुगली टाकली. ते म्हणाले, "मेटे बिनशर्त आमच्यासोबत आले. त्यांची फक्त एकच अट होती ती म्हणजे मराठा आरक्षणाची. ती आम्ही पूर्ण केली.' शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकदेखील आम्ही रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण करणार आहोत. स्मारकाच्या कामासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करणार असून त्याचे अध्यक्षपद मेटे यांच्याकडेच सोपवणार असल्याचे सांगून फडणवीस यांनी मेटे यांची दांडी उडवली.