पुणे- आदरणीय संतश्रेष्ठांविषयी पुस्तकांमध्ये बदनामीकारक मजकूर लिहिल्याबद्दल ज्येष्ठ लेखक आनंद यादव व प्रकाशक सुनील मेहता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच संबंधित पुस्तके अपील मुदतीनंतर नष्ट करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
आनंद यादव लिखित संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या पुस्तकांमध्ये संतांविषयी कपोलकल्पित, बदनामीकारक मजकूर लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. संत तुकोबांचे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी एप्रिल 2009 मध्ये डॉ. यादव, स्वाती यादव तसेच प्रकाशक सुनील मेहता यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती, तर आपले लेखन संशोधनपूर्वक सिद्ध केलेले वास्तववादी चरित्रात्मक कादंबरीचे लेखन आहे, असा दावा डॉ. यादव यांनी केला होता. प्रत्यक्षात ते कपोलकल्पित, आक्षेपार्ह, बदनामीकारक असल्याचा आक्षेप मोरे यांनी घेतला होता.
हे लेखन आक्षेपार्ह असल्याचा आरोप जिल्हा न्यायालयाने मान्य केला व दोन्ही पुस्तकांचे लेखक डॉ. आनंद यादव तसेच प्रकाशक सुनील मेहता यांना दोषी ठरवले. प्रत्येकी दहा हजारांचा दंड व तो न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी शिक्षा न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी सुनावली आहे. स्वाती यादव यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. ही दोन्ही पुस्तके अपील मुदतीनंतर नष्ट करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दाद मागणार : मेहता
डॉ. आनंद यादव यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने लिहिलेल्या कादंबर्यांमागे कुठल्याही एका संप्रदायाला दुखावण्याचा हेतू असेल, असे वाटत नाही. शिवाय प्रकाशक म्हणून गेल्या 37 वर्षांत एकदाही असा प्रसंग आला नाही. आम्ही या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागणार आहोत, असे प्रतिपादन मेहता पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख सुनील मेहता यांनी केले. ‘संतसूर्य तुकाराम’ हे पुस्तक यापूर्वीच मागे घेण्यात आले आहे. ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ची सध्या पाचवी आवृत्ती बाजारात आहे. एकूण दहा हजार प्रती यापूर्वी खपल्या आहेत. उर्वरित प्रतींची विक्री थांबवण्यात आली आहे. या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह काही असते तर आजवर वाचकांपैकी कुणी तरी कधी तरी त्यावर बोलले असते. वाचकपत्रातून उल्लेख झाला असता वा वृत्तपत्रांच्या व्यासपीठावरून त्यावर बोलले, लिहिले गेले असते. पण असे काहीही आजवर झालेले नाही. उलट या लेखनाविषयी सतत कौतुकानेच लिहिले वा बोलले गेले आहे, याकडेही मेहता यांनी लक्ष वेधले.
सहन करणार नाही
संत तुकाराम यांचे वंशज जयसिंग मोरे म्हणाले, हा निकाल समाधानकारक नाही. अन्य राष्ट्रांमध्ये संतनिंदा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्याला अन्य देशात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. असा कायदा आपल्या देशात नाही. कुणीही उठावे आणि संतांवर लिहावे, अशी परिस्थिती आहे. मात्र, आम्ही हे सहन करणार नाही. शिवाय असा कायदा व्हावा, यासाठी प्रयत्न करू.