आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे निधन, \'दीनानाथ मंगेशकर\'मध्ये अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी एका कार्यक्रमात बोलताना (फाईल फोटो) - Divya Marathi
ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी एका कार्यक्रमात बोलताना (फाईल फोटो)
पुणे- ज्येष्ठ समीक्षक डॉ. दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (द. भि. कुलकर्णी) यांचे (वय 82) आज सकाळी पुण्यात निधन झाले. कोथरूडमधील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2010 साली पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द. भि. यांनी भूषवले होते. पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच पार पडलेल्या 89 व्या मराठी साहित्य संमेलनाला त्यांनी हजेरी लावली होती. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी साहित्य विश्वात दभि नावाने ओळख असलेल्या या ज्येष्ठ समीक्षकाचा जन्म नागपूरात 1934 साली झाला होता. पहिली परंपरा, दुसरी परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना आदी त्यांचे साहित्य गाजले. मूळ कवी असलेल्या 'दभिं'नी समीक्षक म्हणून त्यामुळेच आपली छाप पाडली. नागपूर विदयापीठातून त्यांनी 1968 साली पीएचडी मिळवली. त्यांना विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती पदवी मिळाली होते. तसेच नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक त्यांना मिळाले होते.
'दभिं'ना 1953 साली न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला होता. 1991 साली महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला होता. 2007 साली त्यांना पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार मिळाला तर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’मिळाला आहे. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला होता.
साक्षेपी समीक्षक गमावला : मुख्यमंत्री
ज्येष्ठ समीक्षक डॉ. दत्तात्रेय भिकाजी ऊर्फ द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने आपण एक महत्त्वाचा साक्षेपी लेखक-समीक्षक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. कुलकर्णी यांनी मराठी साहित्यातील एकूणच समीक्षेला नवा आयाम दिला. केवळ समीक्षाच नव्हे तर त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे लिखाण केले. त्यांचे ग्रंथ अभ्यासकांना सदैव मार्गदर्शक ठरतील. त्यांनी काव्य, ललित लेख, कथा आणि समीक्षा असे विविध साहित्यप्रकार प्रभावीपणे हाताळले. ज्ञानेश्वरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अध्यापनाचा विषय होता. डॉ. कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून मराठी साहित्यविश्वाने त्यांच्या समीक्षेचाच जणू गौरव केला होता. त्यांच्या निधनाने केवळ अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर साहित्याचा एक चांगला आस्वादक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपण गमावला आहे.
पुढे वाचा, द.भि. कुलकर्णी यांच्या प्रकाशित साहित्याची यादी...