आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Drama News In Marathi, AAi Retire Hotey, Pune

कलाविश्‍व: ‘आई रिटायर होतेय’ रौप्यमहोत्सवी वर्षात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आपल्या घरकुलासाठी, कुटुंबीयांसाठी अखंडपणे राबत राहणार्‍या गृहिणी आईचे एक वेगळेच रूप दर्शवणारे आणि 1989 पासून सतत गाजत राहिलेले ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त या नाटकाचा नव्या संचातील शतकमहोत्सवी प्रयोग जागतिक महिलादिनी होणार आहे. भक्ती बर्वे यांनी आपल्या अभिनयाने गाजवलेले हे नाटक आता नव्या संचात सादर होत आहे.


प्रसिद्ध लेखक अशोक पाटोळे लिखित ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचा पहिला प्रयोग 17 ऑगस्ट 1989 रोजी मुंबईत शिवाजी मंदिरमध्ये झाला होता. या नाटकाने भक्ती बर्वे यांचे नाव आईच्या वेगळ्या पण ताकदवान भूमिकेशी कायमचे जोडले गेले. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या नाटकाचे भक्तीने तब्बल 750 प्रयोग केले. भक्तीच्या अकाली निधनाने हे नाटक थांबले. घरासाठी आयुष्यभर फक्त कष्ट करणार्‍या आईला कधीच सेवानिवृत्ती नसते. तिच्या कष्टांची घरातल्यांना जाणीवही नसते. अशीच एक आई रिटायर होण्याचा निर्णय घेते आणि मग तिच्या जबाबदार्‍यांचे मोल सार्‍यांना उमगते. असा कथाशय असणार्‍या या नाटकाने घराघरातील स्त्रीची वेदना प्रभावीपणे मांडल्याने हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले.
भक्तीच्या अपघाती निधनानंतर स्मिता जयकर यांनी आईची भूमिका साकारली. सध्या नव्या संचातील आईचे प्रयोगही गाजत आहेत. वीणा फडके या आईची भूमिका साकारत आहेत. नाटकात मांडलेली समस्या, विषय आजही सयुक्तिक असल्याने हे नाटक आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहे.


गुजराती, हिंदीतही लोकप्रिय
‘आई रिटायर होतेय’ या नाटकाची लोकप्रियता गुजराती रंगभूमीवर पोचताच ‘बा रिटायर भायछे’ या नावाने गुजराती भाषेत या नाटकाचे शेकडो प्रयोग पद्माबेन आणि सरिता जोशी यांनी केले. त्याचप्रमाणे हे नाटक अशोक लाल यांनी हिंदीत अनुवादित केल्यावर अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यातील आईची मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

पुलंची शाबासकी
‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचा 700 वा प्रयोग खुद्द पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंच्या उपस्थितीत रंगला होता. हा प्रयोग, त्यातील भक्तीची भूमिका, अभिनय पाहून पुलंनी खास त्यांच्या शैलीत पत्र लिहून निर्मात्यांचे कौतुक केले होते.