आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी ई-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ना. धों. महानोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘मराठी ई-साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान यंदा ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी ‘पद्मश्री’ ना. धों. महानोर भूषवणार आहेत. ‘युनिक फीचर्स’च्या वतीने आयोजित या अभिनव संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.
या संमेलनाचे उद्घाटन 24 मार्च 2014 ला नाशिकमध्ये कुसुमाग्रज स्मारक सभागृहात होत असून, त्या दिवसापासून जगभरातील मराठी साहित्य रसिकांसाठी हे संमेलन खुले होईल.
‘युनिक फीचर्स’ने 2011 मध्ये पहिले मराठी साहित्य ई-साहित्य संमेलन भरविले. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी पहिल्या ई-संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले, त्यानंतर दुसरे संमेलन कवी ग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली, तर तिसरे संमेलन ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. भारतातूनच नव्हे, तर जगभरातील अमेरिका, इंग्लंड, नायजेरिया, जर्मनी, हाँगकाँग, सौदी अरेबिया, जपान, इजिप्त, चीन आदी पंचवीसहून अधिक देशांमधील मराठी रसिक या संमेलनात सहभागी झाले.
यासंदर्भात ‘युनिक फीचर्स’चे संपादक-संचालक डॉ. सुहास कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही चौथे मराठी ई-साहित्य संमेलन भरगच्च स्वरूपात आहे. मुलाखत, चर्चा, गप्पा, कविसंमेलन, मुक्त कट्टा अशा विविध गोष्टी लिखित मजकुराबरोबरच ऑडिओ-व्हिडिओ स्वरुपात या संमेलनात असणार आहेत. या संमेलनाचा घरबसल्या आस्वाद घेता येणार असून त्यात सहभागीही होता येणार आहे. त्यामुळे जगभरातल्या मराठी रसिकांसाठी ही मोठीच मेजवानी ठरणार आहे.
यंदाच्या संमेलनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या मराठी साहित्यविश्‍व समृद्ध करणार्‍या लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन हा उपक्रम. अशा दहा दिवंगत लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन यंदाच्या संमेलनातही केले जाणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ते उपलब्ध असणार आहे. हा उपक्रम केवळ ई-संमेलनापुरता सीमित नसून, मराठी साहित्य आणि साहित्यिक यांना माहितीच्या या व्यासपीठावर स्थान असावे यासाठी हा उपक्रम यापुढेही चालू राहणार आहे.