आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यास गती, सल्लागार समितीची मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी भाषेच्या सर्वांगीण विकास आणि प्रचारासाठी मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीने मराठी विद्यापीठाचा ठराव मान्य केला असून, प्रस्तावित मराठी विद्यापीठाचा प्रारूप आराखडाही तयार केला आहे. येत्या चार दिवसांत हे प्रारूप राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ही माहिती दिली. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यासंदर्भातील प्रस्तावही एक वर्षापूर्वीच शासनाला सादर करण्यात आला होता. मराठी विद्यापीठाचा प्रारूप आराखडा कसा असावा तसेच अन्य तपशील नेमके कसे असावेत, याविषयीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पुण्याच्या शासकीय विर्शांतीगृहात पार पडली. या बैठकीतील निर्णयांची माहिती डॉ. कोत्तापल्ले यांनी नंतर पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, मराठी विद्यापीठ प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर कार्यरत राहील. मराठीच्या बोलीभाषा आणि लोककलांचे सर्वेक्षण, मराठीचा सर्वदूर वापर वाढवणे यासाठी विद्यापीठ काम करेल. मराठी विद्यापीठाचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. त्याचा निर्णय शासनच घेईल.

भाषा धोरणाचा मसुदा तयार
भाषा सल्लागार समितीकडे भाषा धोरण तयार करण्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याविषयी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, की भाषा धोरणाच्या मसुद्याचे काम पूर्ण झाले आहे. या मसुद्याविषयीच्या आढावा बैठकाही झाल्या आहेत. आता मसुद्याची रचना पडताळण्याचे काम सुरू आहे.
प्रारुपात काय?
मराठी भाषा विद्यापीठात सुसज्ज मोठे ग्रंथालय, पोथी साहित्याचे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, भाषा प्रयोगशाळा यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जावी, असे समितीने प्रारूप आराखड्यात सुचवले आहे.

दहा संकुले
मराठी विद्यापीठाची 25 उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी दहा संकुले निर्माण करावीत, असे समितीने सुचवले आहे. ही संकुले पुढीलप्रमाणे
1) दूरशिक्षण आणि विस्तार संकुल
2) अनुवाद विद्या संकुल
3) तौलनिक भाषाभ्यास संकुल
4) मराठी कला व संस्कृती संकुल
5) उपयोजित भाषा संकुल
6) ज्ञानभाषानिर्मिती संकुल
7) भाषा प्रमाणीकरण संकुल
8) विस्तारसेवा संकुल
9) संशोधन व प्रशिक्षण संकुल
10) माहिती व तंत्रज्ञान संकुल

अभिमानाची बाब
मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. त्यातही माहिती-तंत्रज्ञान संकुलाद्वारा जगभरातील मराठीच्या अभ्यासकांशी संवाद साधणे शक्य होईल. नव्या पिढीलाही आत्मीयता वाटेल.’’ डॉ. नागनाथ कोत्तापल्ले