पुणे - पुढील वर्षी पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची मतदार यादी साहित्य महामंडळाच्या वतीने येथे प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण १०७० मतदारांचा या यादीमध्ये समावेश आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मतदारांची अधिकृत यादी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केली. आता हे १०७० मतदार अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान करून अध्यक्षांची निवड करतील.
दरम्यान, घुमान येथील नियोजित संमेलनस्थळाची पाहणी, सोयी, वाहतूक व्यवस्था आदींची माहिती प्रत्यक्ष भेटून घेण्यासाठी महामंडळाची टीम घुमानला रवाना होणार आहे. अध्यक्षा डॉ. वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, खजिनदार सुनील महाजन तसेच निमंत्रक
भारत देसलडा आणि आयोजक संजय नहार हेही या टीमसोबत असतील, असेही सूत्रांनी सांिगतले.