आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Literature News In Marathi, Marathi Sahitya Sammelan, Divya Marathi

पंजाबातही मिळेल आता मराठी तडक्याची चव, पुणेकर कुटुंब घुमानमध्ये सुरू करणार हॉटेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी सारस्वतांचा मेळा पुढील वर्षी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाबमधील घुमानला जमणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘बल्ले बल्ले’ भूमीत चक्क मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा खास तडका अनुभवता येणार आहे. त्यासाठी जीवन साठे हा युवक आपल्या कुटुंबीयांसह घुमानला रवाना झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तेथे भाड्याने घेतलेल्या जागेत एक मराठमोळे हॉटेल तो सुरू करणार आहे.

घुमानला मराठी साहित्य संमेलन प्रथमच होणार असले, तरी संत नामदेवांच्या या भूमीत दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने हजारो मराठी बांधव येतात. त्यांच्यासाठी अस्सल मराठमोळे जेवण व अन्य खाद्यपदार्थ तेथे उपलब्ध होणार आहेत.

सिंगापूरमधून शिक्षण : महाराष्ट्रात जागोजागी जर ‘शेर-ए-पंजाब’ आहे, तर पंजाबमध्ये मराठी तडका का नसावा, असा सवाल साठे यांनी केला. त्यांनी कुणाल शिंदे, सचिन सोनवणे यांनाही आपले सहकारी म्हणून सोबत नेले आहे. कुणालने तर सिंगापूरमधून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय कोकणातील जांभूळवाडीचे हरिश्चंद्र गमले हे आचारी आणि पोळ्या करणा-या आजीदेखील घुमानला रवाना झाल्या आहेत. या निमित्ताने पाकिस्तानपासून फक्त 23 किमी अंतरावर मराठी तडका पर्यटक आणि सारस्वतांच्या स्वागताला सिद्ध असेल.

स्वागतार्ह निर्णय : संजय नहार
घुमानच्या संमेलनाचे संयोजक व सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार म्हणाले, जीवन साठे हे अनेक वर्षे सरहदसोबत आहेत. साठे यांनी घुमानला जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. सल्ला घेतला. जागा भाड्याने मिळवली. मनुष्यबळ गोळा केले. पूर्वतयारी करूनच त्यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

धाडसी पाऊल : देसडला
साहित्य संमेलनाचे निमंत्रक भारत देसडला म्हणाले, पंजाबमध्ये मराठी खाद्यपदार्थ देण्याची तळमळ दाद देण्याजोगी आहे. घुमानला रेस्टॉरंट सुरू करण्याची साठे यांची कृती धाडसी व सकारात्मक आहे.