आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचे पुण्यात निधन; अाज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, वैचारिक, ललित..अशी साहित्याच्या क्षेत्रात विपुल मुशाफिरी करत, ग्रामीण जीवनाचे वास्तव वाचकांसमोर मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद रतन यादव (८२) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबीयांनी सांगितले.

डॉ. यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील कागल येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी मराठी व संस्कृत विषयांत पदव्युत्तर पदवी मिळवली होती.‘मराठी लघुनिबंधाच्या प्रेरणा, प्रवृत्ती आणि विकास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएचडी मिळवली. काही काळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांनी नोकरी केली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते अध्यापक झाले आणि १९९५ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यावरील ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ आणि संत तुकाराम महाराज यांच्यावरील ‘संतसूर्य तुकाराम’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या लेखनामुळे यादव वादग्रस्त ठरले होते. या कादंबऱ्यांतील लेखनावरउर्वरित. पान १२

वारकऱ्यांनी आक्षेप घेऊन डॉ. यादव यांना २००९ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापासून (अध्यक्षीय भाषण करू न देता) वंचित ठेवले होते. या प्रकारामुळे यादव यांनी नवे लेखन थांबवले होते. त्यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवर चित्रपट निर्माण झालेला चित्रपट मात्र गाजला आणि यशस्वी झाला. ग्रामीण साहित्य संमेलन आणि समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

साहित्यसंपदा अशी
कथा : खळाळ, माळावरची मैना, घरजावई, डवरणी, आदीताल, उखडलेली झाडं, भूमिकन्या, झाडवाटा, शेवटची लढाई, उगमती मने
कवितासंग्रह : हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकरं, रानमेवा - बालकविता, सैनिकहो तुमच्यासाठी
कादंबऱ्या : गोतावळा, नटरंग, एकलकोंडा, माऊली, कलेचे कातडे
आत्मचरित्र (४ खंड) : झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल
वगनाट्य : रात घुंघुराची
ललितगद्य : मातीखालची माती (व्यक्तिचित्रे), स्पर्शकमळे, पाणभवरे, ग्रामसंस्कृती, साहित्यिकाचा गाव

समीक्षा - ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि समस्या, ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती, साहित्याची निर्मितीप्रक्रिया, १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह, मराठी लघुनिबंधाचा इतिहास, आत्मचरित्र मीमांसा
संपादने : मातीतले मोती, निळे दिवस, तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा, मराठी ग्रामीण कथा, कथावैभव, माझ्या आठवणी आणि अनुभव :विठ्ठल रामजी शिंदे,

पुरस्कार : साहित्य अकादमी - झोंबी, राष्ट्रीय हिंदी अकादमी, कोलकता यांचा उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मितीबद्दलचा सन्मान, महाराष्ट्र राज्य शासनाची १३ पारितोषिके.
बातम्या आणखी आहेत...