आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० व्या वर्षी संस्कृत शिकले, ८८ व्या वर्षी टायपिंग, सुंदरकांडाचा इंग्रजीत अनुवाद करून शंभरीत विमोचन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शरीराला वार्धक्य येऊ शकते, पण इच्छाशक्तीला कधीच नाही. अमेरिकेच्या टेक्सासमधील क्रिस्को गावात राहणारे भारतीय रामलिंगम सरमा यांनी याचीच प्रचिती दिली. संस्कृतातील सुंदरकांडाचे इंग्रजी अनुवादाचे १२ वर्षे म्हणजे एक तप सुरू असलेले काम सरमा यांनी शंभराव्या वाढदिवशी पूर्ण केले. आपल्या हयातीत सुंदरकांडातील ज्ञान जगासमोर मांडण्याची त्यांची इच्छा होती. स्वत:लाच दिलेला शब्द प्रेरक ठरला आणि सरमा यांनी शिवधनुष्य पेलले. हा ग्रंथ विक्रीसाठी नसून, ग्रंथालये, संस्कृत अभ्यासकांना मोफत दिला जाणार आहे. वयाच्या पासष्टीत केलेला संकल्प कोणत्याही आधाराविना कसा पूर्णत्वास नेला याची सरमा यांनी फाेनवर सांगितलेली कथा...
लहानपणी आजोबा आणि आई सुंदरकांडाचे पाठ करायचे. त्या वेळी अर्थ समजत नव्हता, पण ऐकण्यास मधुर वाटायचे. काॅलेज संपवून बंगळुरूतील हिंदुस्ताना एरोनाॅटिक्समध्ये रुजू झालो. सुंदरकांडाचे ते पाठ आठवणीतच राहिले. नाेकरी, प्रपंचाच्या व्यापात ३२ वर्षे निघून गेली. पस्तिशीत असताना मला तामिळ भाषेतील सुंदरकांड वाचायला मिळाले. मी भारावून गेलो. इतके गारूड केले की हजारो वर्षांपूर्वी मूळ संस्कृतात रचलेला हा ग्रंथ वाचण्याचा निर्धार केला. पण त्या वेळी मला संस्कृतही येत नव्हते आणि शिकायला वेळही मिळाला नाही. त्यामुळे संस्कृतातील सुंदरकांड वाचू शकलो नाही.

सेवानिवृत्त झाल्यावर काही वर्षे प्रशिक्षण देणे व इतर प्रकल्प पूर्ण करण्यात निघून गेली. पत्नी शकुंतलासोबत मी भारतात राहत होतो. परंतु तिच्या निधनानंतर मुलाने अमेरिकेत बोलावून घेतले. तेथेच मी स्थायिक झालो. सध्या टेक्सास प्रांतातील क्रिस्को गावात राहतो. ८० व्या वर्षी एकदा घरात बसलो असता लहानपणीच्या आठवणीत हरवून गेलो. आजोबा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या सुंदरकांडाची आठवण झाली. संस्कृतातील सुंदरकांड वाचण्याचा संकल्पही आठवला. सरधोपट जगण्यापेक्षा ६५ वर्षांपूर्वी ठरवलेले हे अधुरे काम पूर्ण करावे अशी जाणीव मला त्या दिवशी झाली.

संस्कृत शिकण्यापासून सुरुवात केली. टेक्सासमध्ये त्या वेळी संस्कृत शिकवणारे कोणीही मिळाले नाही. मग इंटरनेटच्या मदतीने स्वयं अध्ययन सुरू केले. संस्कृत शिकणे व संुदरकांड वाचून ते समजून घेण्यात आठ वर्षे निघून गेली. या ग्रंथाचा अभ्यास समाजासाठी आवश्यक असल्याच्या जाणिवेतूनच मग त्याचा इंग्रजीत अनुवाद करण्याचा विचार केला. वयाच्या ८८ व्या वर्षी टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. संस्थेतील सर्वांत वयोवृद्ध विद्यार्थी मी होतो. कधी मुलगा, तर कधी नातू संस्थेत सोडण्यासाठी येत होता. शनिवारी, रविवारी दोन दिवस संस्था सुरू असायची. उरलेले पाच दिवस घरीच सराव करायचो. थोडी गती आली तेव्हा अनुवादाचे काम सुरू केले. १२ वर्षे अव्याहत अनुवादाचे काम करत गेलो. यंदाच्याच ६ फेब्रुवारी रोजी मी वयाची शंभरी पूर्ण केली.ग्रंथाचे विमोचन करून त्यांनी वाढदिवस साजरा केला.

या वयातही रामलिंगम आयपॅडवरील स्क्रीनच्या साह्याने रोज ४ तास वाचन करतात. धावपळीच्या जगरहाटीत आजची पिढी गोंधळून जात आहे. प्राचीन ग्रंथांपासून दुरावत आहेत. त्यांनी हे वाचावे, अभ्यासावे आणि जीवनदृष्टी मिळवावी, असे त्यांना वाटते. राजहंस प्रकाशनाने काढलेल्या सुंदरकांडाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रत्येकी ६५० पृष्ठांचे दोन खंड आहेत. संस्कृत आणि रोमन दोन्हींतही श्लोक आहेत. महत्त्वाच्या शब्दांचे इंग्रजीत अर्थ आणि शेवटी श्लोकाचा इंग्रजीतून अर्थ स्पष्ट केलेला आहे.
पुढील स्लाईडवर बघा रामलिंगम सरमा यांचे काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...