आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानपीठप्राप्त सारस्वतांच्या उपस्थितीत घुमानचे संमेलन !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला अन्य भाषांतील ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांची उपस्थिती लाभण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्येष्ठ उर्दू लेखक रेहमान राही तसेच पंजाबी साहित्यिक दयालसिंह या ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखकांनी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त आहे. साहित्य महामंडळाची बैठक नुकतीच गुलबर्गा येथे पार पडली. या बैठकीत संमेलनाची रूपरेखा ढोबळमानाने ठरवण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि स्वागताध्यक्ष भारत देसलडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका अंतिम स्वरूपात महामंडळाच्या पुढील बैठकीतच निश्चित केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
संमेलनाचे अखिल भारतीय स्वरूप लक्षात घेता, पंजाबमध्ये होणाऱ्या संमेलनासाठी अमराठी ज्येष्ठ साहित्यिकांना पाचारण करण्याचा मानस असून, काही लेखकांशी संपर्क साधून पत्र दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

विश्व संमेलन रखडलेच
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सध्या तरी लगाम बसल्याचे स्पष्ट झाले आहे. संमेलनाचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, प्रथम लोकसभेची नंतर विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने हा प्रस्ताव निर्णयाविनाच आहे. आता नव्याने अनुदानाचा प्रस्ताव दिला जाणार आहे, असे डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या.

शुल्क ३००० रुपये
संमेलनासाठी तीन हजार रुपये प्रतिनिधी शुल्क ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही वेळचा प्रवास, निवास, भोजनचा समावेश आहे. तसेच जे थेट घुमानला येणार आहेत, त्यांच्यासाठी निवास, भोजनाचे शुल्क १५०० रुपये आहे. प्रतिनिधी नोंदणी एक डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ पर्यंत केली जाणार आहे. प्रकाशकांसाठी फक्त ११०० रुपयांत संमेलनात गाळे उपलब्ध केले आहेत. त्याची नोंदणीही ३१ जानेवारीपर्यंत करता येईल.

दिंड्यांची मांदियाळी
वारीमध्ये जशा ठिकठिकाणाहून दिंड्या सहभागी होतात, त्याच धर्तीवर घुमानच्या संमेलनासाठी राज्यातून ग्रंथदिंड्या सामील होणार आहेत. नांदेड येथील नानक साई फाउंडेशनतर्फे साहित्यप्रेमी तसेच नामदेवभक्तांची दिंडी सचखंड एक्स्प्रेसने प्रस्थान ठेवणार आहे. अमृतसरला एक एप्रिल रोजी या दिंडीचे स्वागत केल्यावर ही दिंडी अमृतसर ते घुमान अंतर पायी पार करणार आहे. प्रतिशिर्डी शिरगाव येथून माजी आमदार प्रकाश देवळे यांची साईभक्तांची दिंडीही घुमानला येणार आहे. औंढा नागनाथ येथील नामदेवांच्या जन्मगावापासूनही दिंडी निघणार आहे. कवी नारायण सुमंत यांचे जन्मगाव मोडनिंब येथूनही दिंडी येणार आहे. राज्यातून येणाऱ्या विविध दिंड्यांचे स्वागत घुमानला करताना आम्हाला विशेष आनंद होईल, असे भारत देसलडा म्हणाले.