आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sammelan : Condemiming Dabholkar Murder

मराठी साहित्य संमेलन: दाभोलकरांच्या हत्येचा निषेध; जाब विचारण्यात मात्र असमर्थता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेवनगरी/सासवड - ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून लांछनास्पद असून हे संमेलन या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे,’ असा ठराव 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मंजूर झाला. खुन्यांचा शोध सरकार लावू शकले नाही याबद्दल मात्र नुसतीच खंत व्यक्त करण्यात आली. कडक शब्दांत शासनाचा निषेध करण्याचे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ अध्यक्ष फ. मुं. शिंदे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी घेतले नाही.
सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. तत्पूर्वी खुल्या अधिवेशनात महामंडळाने विविध ठराव मांडले. प्रथेप्रमाणे गतवर्षी निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी ठराव वाचनास सुरुवात केली. यात डॉ. दाभोलकरांच्या खुनाची खंत व्यक्त करणारा अध्यक्षीय ठराव पहिलाच होता. संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार उपस्थित होते. शरद पवार यांनी साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य धाडसाने जपण्याचा सल्ला उद्घाटनप्रसंगी दिला होता. समारोपप्रसंगी साहित्यिकांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि राज्य सरकारला धारेवर धरण्याचे धैर्य दाखवले नाही. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करणारे देशातील पहिलेच राज्य ठरल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव मात्र मंजूर झाला.
एकूण 13 ठराव मंजूर झाले. समारोपात उद्धव ठाकरे आणि अध्यक्ष फमुंनी बेळगाव महाराष्‍ट्रात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सीमावर्तीय बांधवांचा प्रश्न महाराष्‍ट्राचा नव्हे, तर मराठी भाषेचा आहे. आपण तो सोडवला पाहिजे, असे फ. मुं. म्हणाले. बेळगाव, निपाणी, कारवारसह सीमावर्ती भागातील मराठी गावे महाराष्‍ट्रात आणण्यासंदर्भातला ठराव मात्र मंजूर झालेल्या तेरा ठरावांमध्ये नव्हता.
आचार्य अत्र्यांचे स्मारक
संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केलेली इच्छा महामंडळाने पूर्ण केली. संयुक्त महाराष्‍ट्रासाठी महाराष्‍ट्राच्या जनतेला जे प्रखर आंदोलन करावे लागले. त्यात आचार्य अत्रे अग्रेसर होते. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने टपाल तिकीट काढून त्यांचा उचित गौरव करावा तसेच अत्रे यांचे मुंबईत भव्य स्मारक उभे करावे, अशी आग्रहाची मागणी करणा-या ठरावाला संमेलनात टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी मिळाली.
संमेलनातील महत्त्वाचे ठराव
* मराठीवरील आक्रमणे थोपवण्यासाठी आणि अर्थार्जनासाठी ती उपयुक्त ठरण्यासाठी नोकरी संपादनात मराठीला प्राधान्य देणारे आवश्यक निर्णय शासनाने विनाविलंब घ्यावेत.
* प्राथमिक व माध्यमिक शाळांना विनाअट आणि वेतनेतर अनुदानासह शासनाने त्वरित परवानगी द्यावी.
* मराठवाड्यातील जनतेचे पाण्याअभावी अतोनात हाल सुरू असून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही याची संमेलनाला खंत वाटते. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न विनाविलंब सोडवावा.
* खास बालकुमारांसाठी शासनाने स्वत:ची मराठी दूरचित्रवाणी सुरू करावी.