पुणे - सारे जग टेक्नो युगात वावरत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मात्र काळासोबत राहण्याऐवजी मागे जात असल्याची टीका अध्यक्षपदाच्या रिंगणात उडी मारलेल्या उमेदवारांनी केली. उमेदवारांना महामंडळाने दिलेल्या मतदार यादीत मतदारांचे फक्त पत्ते असल्याने उमेदवार नाराज झाले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे एप्रिल २०१५ मध्ये होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत, भारत सासणे आणि पुरुषोत्तम नागपुरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. आजवर साहित्य महामंडळाकडून उमेदवारांनी सर्व मतदारांची नाव, पत्ता,
मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणारी एकत्रित यादी देण्यात येत होती. त्यामुळे विविध प्रकारे मतदारांच्या संपर्कात राहणे उमेदवारांना शक्य होत असे. यंदा मात्र महामंडळाने केवळ मतदारांचे पत्ते असणारी यादी उमेदवारांना दिल्याने संपर्क साधणे अवघड बनले आहे, अशी प्रतिक्रिया चारही उमेदवारांनी व्यक्त केली.
अध्यक्षपदाचा निकाल १० डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे ९ डिसेंबर ही मतपत्रिका महामंडळाकडे पोचण्याची अंतिम तारीख आहे. तसेच मतपत्रिका यंदा रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात न आल्याने नेमक्या कोणापर्यंत त्या पोचल्या आहेत, हे कळण्यास मार्ग नाही.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, मतदार राज्यभर तसेच राज्याबाहेर विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे मर्यादित वेळात सर्वांपर्यंत पोचणे अवघड बनले आहे. सध्या फक्त पत्ररूपाने आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटींतून संपर्क करत आहे.
भारत सासणे म्हणाले, राज्याबाहेरील मतदारांना भेटण्यासाठी मी नुकताच छत्तीसगड, मध्य प्रदेशचा दौरा केला. तेथे काही जणांना अद्याप मतपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. महामंडळाचा निर्णय म्हणजे काळाच्या मागे धावण्यासारखे आहे. डॉ. अशोक कामत म्हणाले, महामंडळाने नेमका कोणता विचार करून मतदारांची यादी दिली आहे, ते समजत नाही. ई-मेल आणि मोबाइल ही मतदारांपर्यंत पोचण्याची सध्याची अतिशय प्रभावी माध्यमे आहेत. त्याचीच अनुपलब्धता आहे.
पुरुषोत्तम नागपुरे म्हणाले, महामंडळाची भूमिका अनाकलनीय आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोचणे कठीण बनले आहे, तरीही पत्र आणि भेटीगाठी सुरू आहेत.