आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sammelan : From Today Marathi Literature Festivel Starts

मराठी साहित्य संमेलन : आजपासून सारस्वतांचा मेळा; पवार, फमुंच्या भाषणाची उत्सुकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेतून 136 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मराठी भाषेच्या जागर सोहळ्याचे पुढचे पाऊल शुक्रवारी (दि. 3) सासवड येथे पडत आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ होत आहे.
यंदाचे संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी लिखित भाषण न वाचता उत्स्फूर्त बोलण्याचे जाहीर केले आहे. शिंदे काय विचार मांडतात याकडे मराठीजनांचे लक्ष असेल. त्याचप्रमाणे सलग दुस-या वर्षी संमेलनाचे उद््घाटन करणा-या पवारांच्या भाषणाकडेही महाराष्ट्राचे कान लागलेले असतील. या वेळी ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, राजेंद्र बनहट्टी, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. द. भि. कुलकर्णी आदी उपस्थित असतील. संमेलनस्थळी उभारलेल्या 52 हजार चौरस फुटांच्या मंडपात 270 ग्रंथदालने आहेत. या ठिकाणी विविध प्रकाशक सवलतीच्या दरात पुस्तविक्री करणार आहेत. लेखक, वाचक, प्रकाशक यांच्यातील सुसंवादासाठी खास ‘प्रकाशन मंच’ उभारण्यात आलाय. ग्रंथनगरी, मुख्य सभामंडप आणि भोजन मंडपाचा सहा कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.
संमेलनासाठी दरवर्षी राज्य सरकारकडून 25 लाखांचा धनादेश दिला जातो. संयोजन समितीच्या नावे हा धनादेश देण्याचा शिरस्ता आहे. यंदापासून तो प्रथमच थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नावे दिला आहे. सरकारचा हा निर्णय महामंडळास सुखावणारा आहे. यामुळे आयोजकांवर महामंडळाकडे निधी मागण्याची वेळ आली आहे.