आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sammelan : Kayadhu And Karhe Wate In My Blood F.M. Shinde

मराठी साहित्य संमेलन: कयाधू आणि क-हेचे पाणी माझ्या रक्तात - फ.मुं. शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेव नगरी /सासवड - संमेलन संपले म्हणून मंडपातल्या मंडपात नाही तरी, मनामनात तुमच्या आणि माझ्या भेटी होतच राहणार आहेत. माझे गाव कळमनुरी कयाधू नदीच्या काठी आहे आणि इथे क-हेकाठी या आनंदसोहळ्यात माझा सन्मान झाला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवाहांचे पाणी माझ्या रक्तात वाहते आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे यांनी समारोपप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रसिकांची ही अलोट गर्दी म्हणजे जनसागर आहे आणि क-हेच्या भेटीला आंतरिक ओढीने तो आला आहे. सभामंडपाबाहेर अनेक रसिक ताटकळत उभे होते. पण माझ्या हृदयाच्या सावलीत मी त्यांना सामावून घेतले होते, असे भावुक उद्गार काढून फ.मुं. म्हणाले की, कोणताही आरोप नसलेला हा समारोप आहे. वृत्ती सकस ठेवली की कोणताही आकस निर्माण होत नाही. हसरी माणसे किती छान दिसतात. अंत:करणाचा आरसा झाला की प्रतिबिंब छान उमटतं. तसेच हे आहे. भाषणात शेवटी फ.मुं. यांनी आपल्या गाजलेल्या आई या कवितेसह काही कवितांमधूनही आपल्या भावना व्यक्त केल्या. एका कवितेत ते म्हणतात,
मतलबी जगण्यात कोण असतो सोबत कोणाच्या
मी उत्सवात आहे माझ्या एकटेपणाच्या
आहे कधी संपलेली लढाई सुखासाठी
सोडले आणून सुखाने रणांगणाच्या
मी उत्सवात आहे माझ्या एकटेपणाच्या
जीव थकतो जीव चुकतो नित्य चालता चालता
मुंगीचे मन माझे शोधात कणाकणाच्या
मी उत्सवात आहे माझ्या एकटेपणाच्या
फ.मुं.ची मस्त मुशाफिरी
1. तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी मला फारसे अप्रूप वाटत नाही. कारण हा देशच आहे टाळ्यांचा आणि घोटाळ्यांचा.
2. आमचे अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख, हर्षवर्धन पाटील ही मंडळी किती छान दिसतात. हे नेते नव्हे, अभिनेते झाले असते तरी चालले असते. फक्त क्षेत्र बदललं असतं.
3. माझे गुरुवर्य मिरासदार प्रकृती ठीक नसतानाही ‘दमा दमा’नं का होईना संमेलनाला आले याचा मला आनंद वाटतो.
4. आज शिवराय असते तर कोणत्या पक्षात गेले असते, असे मला विचारले गेले. त्यावर मी म्हणालो, शिवसेनेला ते भलेही हक्काचे वाटत असले तरी शिवराय मात्र पंचांगातील कृष्ण आणि शुक्ल पक्षापैकी शुक्ल पक्षात गेले असते.
5. विलासराव एकदा परिवहन मंत्री होते. अचानक त्यांचे खाते बदलले. त्यांना कृषी खाते दिले. तेव्हा खेड्यातील एका माणसाने मला खूप छान प्रश्न विचारला होता. ‘विलासरावांना एसटीतून शेतात का फेकले?’ असा तो प्रश्न होता. त्यावर मी उत्तर दिले, विलासरावांना कोठून कोठेही फेकले तरी इजा झाल्याची बातमी आलेली नाही.