आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाचा समाराेप: संधीसाधू लाेकच प्रवाहासाेबत चालतात- नितीन गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा-तुकाराम नगरी (पिंपरी) - "सत्ता कितीही शक्तिशाली असली तरी ती डोळे नष्ट करू शकते. त्यामागचे विचार नाही. देशात लिहिण्याचे आणि बोलण्याचेही स्वातंत्र्य आहे, मात्र जात, पंथ, भाषा, व्यक्ती यापलीकडे जाऊन समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्माणाचे कार्य साहित्यिकांनी त्यांच्या लेखनातून करावे,' असे अावाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. देशात विचारभिन्नतेचा प्रश्न नाही तर विचारशून्यतेचा आहे. आम्ही डावे किंवा उजवे नसून फक्त संधीसाधू आहोत. म्हणूनच आपल्यातले बहुतेक जण प्रवाहाबरोबर चालत राहतात,’ अशीही टिप्पणी गडकरी यांनी केली.

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रविवारी दिमाखदार सांगता झाली. या वेळी ते बोलत होते. चार ज्ञानपीठ विजेत्यांची उपस्थिती, चार कोटींची ग्रंथविक्री, १३ परिसंवाद, तीन कविसंमेलने, लाखो श्रोत्यांची गर्दी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा अभूतपूर्व सर्व विक्रमांची नोंद करणाऱ्या संमेलनाच्या समारोपालाही श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
राजकीय माणसांनी राजकारण सोडून इतर बाबतीत ढवळाढवळ करू नये. म्हणून मी साहित्यावर भाष्य न करता तुमच्या विचारार्थ मुद्दा ठेवतो आहे, असे सुरुवातीलाच स्पष्ट करून गडकरी म्हणाले, ‘ साहित्यिकांच्या शब्दातून देशाचा इतिहास घडणार आहे. व्यंगात्मक पद्धतीने निश्चितपणे काही लिहिले जाते. मात्र त्यामागचा विचार केवळ मनोरंजनात्मक नसावा. देश बदलतो आहे. काल आहे ते आज नाही. अशा वेळी साहित्याच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजाची जडणघडण करणारे साहित्य यायला हवे. भविष्य हे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे आपल्या शेती-उद्योगात बदल करायचे असतील तर जगातील विज्ञान, तंत्रज्ञान, समाज घडवणाऱ्या माणसांबद्दलचे लेखन साहित्यात आले पाहिजे. ज्ञान आणि ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर हे आपले भविष्य आहे. या दृष्टीने उद्याच्या नागरिकावर संस्कार घडवणारे साहित्य मराठीत यावे,’ अशी अपेक्षाही गडकरींनी बाेलून दाखवली.
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सीमाभागाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांना कोड्यात पकडावे, असे सांगितले. ‘कोर्टबाजी न करता हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने मराठीभाषक प्रदेशाला केंद्रशासित म्हणून जाहीर करावे व तेथील मराठी माणसांवरचा अन्याय थांबवावा,’ असे अावाहनही सबनीस यांनी केले. तत्पूर्वी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ मकरंद जावडेकर, दुर्गा जसराज या सर्वांचा सत्कार स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, भाग्यश्री पाटील यांनी केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ आणि शर्वरी जमेनीस यांनी सूत्रसंचालन केले.
रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडे या दमदार गायकांनी सादर केलेल्या ‘आता एकचि मागणी, लोभ अखंड असावा,' या निरोप गीताने समारोप सोहळ्यात बहार आणली.
पाच संस्थांना आर्थिक हातभार
मराठी जतन आणि संवर्धनाचे काम करणाऱ्या पाच संस्थांना प्रत्येकी २ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. यात १८५८ मध्ये तेलंगणात स्थापन झालेली मराठी साहित्य परिषद, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर (मुंबई), चतुरंग प्रतिष्ठान (मुंबई), वाङ््मय चर्चा मंडळ (बेळगाव) आणि खरे मंदिर वाचनालय (मिरज) या संस्थांचा यात समावेश होता.
हे तर महासंमेलन
प्रसिद्ध लेखक चेतन भगत, जावेद अख्तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या संमेलनाचे ताेंडभरून काैतुक केले. ‘अाजवर अाम्ही अनेक संमेलनांना हजेरी लावली. जयपूरमधील लिटरेचर फेस्टिव्हल’ अाजवर देशातील सर्वात माेठे साहित्य संमेलन मानले जात हाेते. मात्र अाज पिंपरीतील हे भव्य-दिव्य संमेलन पाहता देशातील सर्वात माेठे संमेलन हेच म्हणावे लागेल,’ असे भगत व अख्तर म्हणाले.
विनोद तावडे म्हणाले...
- केशवसुत यांचे जन्मगाव मालगुंड (जि. रत्नागिरी) आणि महाबळेश्वरच्या डोंगरातील भिलार (जि. सातारा) येथे "पुस्तकाचं गाव' उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
- शालेय वयापासून मुलगा-मुलगी असा भेद विद्यार्थ्यांच्या मनात तयार होऊ नये म्हणून शालेय अभ्यासक्रमाचे 'जेंडर ऑडिट' करणार आहे.
- उडियाला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब झाला असला तरी तो लवकर खात्रीने मिळेल.