आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलन : फटकारे, ओरखड्यांनी रंगला विडंबन काव्यमेळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेवनगरी - विनोदसम्राट आचार्य अत्रे यांच्या सासवडनगरीत साज-या होणा-या साहित्य संमेलनाच्या आनंदमंदिराला शनिवारी झेंडूची फुले या विडंबन काव्यमेळ्याने तोरण चढवले गेले. राजकीय पुढारी असो की सामान्यांची जगण्याची धडपड, तरुणीच्या गालावरचा खट्याळ तीळ असो की, गात्रे थकली तरी रंगेली कायम असलेला एखादा गडी. या सगळ्यांनाच एका माळेत गोवणारे हे तोरण रसिकांचे निखळ मनोरंजन करणारे ठरले. विडंबनकारांच्या प्रत्येकच रचनेला खळखळून हास्यस्फोटाची दाद मिळत होती.
प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली हा भन्नाट काव्यमेळा असा काही रंगला की खच्चून भरलेल्या सभागृहाची हसून हसून पुरेवाट झाली. खुद्द संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे यांच्यासह संजय वरकड, नारायण सुमंत, जयंत जाधव, संदीप अवचट, गोविंद कुलकर्णी, बंडा जोशी, उदय निरगुडकर, श्याम भुर्के आदींनी या कार्यक्रमात रंगत आणली.
विडंबन काव्यातून समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीतींवर व्यंगात्म नजरेतून बोट ठेवत रसिकांचे मनोरंजन तर केलेच शिवाय उपस्थितांना अंतर्मुख होण्यासही भाग पाडले. आघाडीच्या राजकारणावर सडकून कोरडे ओढताना संजय वरकड यांनी
कॉँग्रेसवाले म्हणाले
आम्हाला साथ द्या
पान सुपारी आहे
तुम्ही फक्त कात द्या..
अशा शब्दांत वरकडी सादर केली.
संमेलनाध्यक्ष फ.मुं. यांची लोकशाही आणि समाजवादाची व्याख्या उपस्थितांची दाद मिळवून गेली.
तिच्या एका स्पर्शाने
म्हातारा तरुण झाला
काठाकाठाने का होईना
अख्खा समुद्र पोहून आला
या त्यांच्या रचनेला मनमुराद दाद मिळाली. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याच्या म्हणीवरून फ.मुं.ना समाजवादाची व्याख्या सापडली.
गालावरचा तीळ तिनं दिला सातांना
प्रत्येकाचा ओठ तिच्या गालाकडे येताना
नाही झाली वादावादी,
तिचा गाल समाजवादी
जयंत जाधव यांनी जय जय महाराष्‍ट्र माझा या गीताच्या चालीवर ‘कर्जात महाराष्‍ट्र माझा’ हे विडंबन सादर केले.
सत्तेसाठी मत्तेसाठी युती आघाडी करती
मिळून सारे राष्‍ट्र लुटू या...
पुढा-यांच्या संगनमताने लूट झाल्यामुळे महाराष्‍ट्र कर्जाच्या खाईत बुडाला आहे याचे मार्मिक चित्रण जाधव यांच्या रचनेत होते. ग़ृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी घातली. त्यामुळे बारबालांवर बेकारीची वेळ आली. रस्त्यावर आलेल्या बारबालांना काम मिळावे अशा मागणीची रचना नारायण सुमंत यांनी सादर केली.
किती सांगू मी सांगू कुणाला
आल्या प्रचारास आज बारबाला
वेळ मारू चला, गर्दी जमवू चला
आला आला ऑर्केस्ट्रा आला
हे काव्य सादर केले. त्यानंतर
शिबिराच्या रात्री गं
हाय वेच्या काठी गं
गोकुळ अवतरले
ग्लास घेऊ हातात
नाचू गाऊ तालात
झेंडेही फुरफुरले
शेजारची तरुणी अपार्टमेंटच्या छतावर नाचत असताना काय बालंट येत होते याचे खुमासदार चित्रण करणा-या बंडा जोशी यांनी केले.
खोलीत छताच्या खाली
आमचा पंखा गदगद हलतो
वर थय थय नाचे तेव्हा
धरणीकंप करीतसे बाई...
सान्यांची मंदा ही बावळी....
लेले यांच्या लीलांनी हास्यांचे फवारे
वार्धक्याने झुकलेले खांदे घेऊन आलेल्या घनश्याम लेले या मनाने तरुण कवीच्या पांढ-या दाढीआडून आलेल्या प्रत्येकच शब्दावर रसिकांची हसून हसून पुरेवाट झाली.
समोर येता शेंग चवळीची,
मला काळजी मम कवळीची
दातावाचून गिळतो
सारे भाताच्या पलीकडले
मधुचंद्र तयाचा कुठला,
मधुमेह मध्येच उठला
लग्नावाचून कळले
सारे लग्नाच्याही पलीकडले
ही रचना भाव खाऊन गेली...