आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमशान : ‘घुमान’चे निमंत्रण कोणत्या निकषावर स्वीकारले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मुख्य सोहळा अमराठी प्रांतात न भरवता मराठीजन असलेल्या भागातच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी मराठी प्रकाशक परिषदेने केली आहे. पंजाबमधील घुमानचे निमंत्रण कोणत्या निकषावर स्वीकारण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने 88 व्या साहित्य संमेलनासाठी निवडलेल्या घुमान येथे समांतर संमेलनास विरोध नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणार नाही, असेही प्रकाशकांनी स्पष्ट केले आहे.

मराठी प्रकाशकांच्या मागण्यांचे निवेदन गुरुवारी पुण्यात साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांना देण्यात आले. प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्याध्यक्ष अरुण जाखडे, आदी या वेळी उपस्थित होते. ‘महामंडळाच्या 14 सप्टेंबरच्या बैठकीत प्रकाशकांच्या निवेदनावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू,’ असे आश्वासन डॉ. वैद्य यांनी दिल्याचे जाखडे यांनी सांगितले.

जाखडे म्हणाले, ‘घुमान येथे संमेलन भरवण्यास आमचा विरोध नाही. परंतु, ज्या गावात एकही माणूस मराठी बोलत नाही, अशा ठिकाणी संमेलन भरवल्यामुळे मराठी भाषेचे कोणते संवर्धन होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. संमेलन घेण्याचा महामंडळाचा अधिकार असला तरी लेखक, वाचक, प्रकाशक या सर्व घटकांचा व्यापक विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दी ग्रंथप्रदर्शनासाठी
‘ज्याला ऐकायला गर्दी होईल, असा लेखक आज मराठीत नाही. ग्रंथप्रदर्शन संमेलनाचा अविभाज्य भाग आहे. पुस्तकविक्रीवरून संमेलनाची यशस्विता ठरवली जाते. प्रकाशकांबद्दल हेटाळणी करण्यातून साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची हीन संस्कृती स्पष्ट होते.’ - मराठी प्रकाशक परिषद

घुमानला कुठली साहित्य परंपरा?
महाराष्ट्राबाहेर बडोदा, इंदूर आदी ठिकाणी मराठी माणसांचे वास्तव्य आहे. ही मंडळी मराठी भाषा, मराठी साहित्य-संस्कृती जतन करण्याचे प्रयत्न करतात. संत नामदेवांचे वास्तव्य सोडल्यास घुमानला मराठी साहित्याची कोणती परंपरा आहे, असा सवाल परिषदेने केला.

प्रकाशकांचे गंभीर आक्षेप
0 संमेलन हे महामंडळाचे पदाधिकारी व जवळच्यांसाठी फुकट्यांचे प्रवासी मंडळ झाले आहे. साहित्य व्यवहाराऐवजी महामंडळ हे पर्यटन केंद्र बनले आहे.
0 संमेलनासाठी 10 ठिकाणची निमंत्रणे आली असता फक्त उस्मानाबाद व घुमानचीच पाहणी का झाली?
0 घुमान येथे छोटेसे का होईना एक तरी ग्रंथालय आहे का ?
0 भविष्यात कोणत्याही एनजीओने कुठल्याही गावाचे निमंत्रण दिल्यास स्वीकारणार?
0 घुमान येथील कोणत्या स्थानिक साहित्य संस्थेने संमेलनाचे निमंत्रण दिले ?
0 घुमानचे निमंत्रण कोणत्या निकषांवर स्वीकारले ?

(फोटो : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर घुमान येथे होणार्‍या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले होते)