आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी संगीत नाटकांचा खजिना आता राष्ट्रभाषेत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठी रसिक मनाच्या र्ममबंधातील ठेव असणारी मराठी संगीत नाटके आता मातृभाषेतून राष्ट्रभाषेत अवतरली आहेत. संस्कृत आणि हिंदी भाषांचे ज्येष्ठ जाणकार व तज्ज्ञ प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी हे आव्हान पेलले आहे. मराठी मनांवर गारूड केलेली तीन अभिजात मराठी संगीत नाटके आता राष्ट्रभाषा हिंदीमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यामध्ये संगीत सौभद्र, संगीत शारदा आणि संगीत कट्यार काळजात घुसली या तीन नाटकांचा समावेश आहे.

मूळचे लातूरचे प्रा. वेदकुमार उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वानप्रस्थार्शम स्वीकारला. मात्र, आयुष्यभर हिंदी भाषेचे अध्ययन, अध्यापन केले असल्याने मातृभाषेतील अभिजात, वेगळ्या साहित्यकृती हिंदी भाषेत अनुवादित करण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे.

‘कट्यार’ आवडते नाटक
‘कट्यार काळजात घुसली हे माझे आवडते नाटक आहे. त्यातील संवाद, दोन गायकींमधील संघर्ष आणि पदे, सारे काही सुंदर आहे. अर्थात सौभद्र, शारदा, कट्यार यांची जातकुळी, विषय, संगीताचा घाट वेगवेगळा असला, तरी रसिकांच्या दृष्टीने त्यांची आस्वादनक्षमता विलक्षण आहे. मुख्य म्हणजे नाट्यसंगीत हा प्रकार या निमित्ताने मला हाताळता आला. शक्यतोवर मी मूळ चाल मनात ठेवूनच अनुवाद केला आहे. गरज पडली तिथे व्रज भाषेचा आधार घेतला आहे. मार्च महिन्यात ही तिन्ही अनुवादित नाटके प्रकाशित होणार आहेत,’ असे वेदालंकार म्हणाले.

‘संगीत शारदा’तून विशेष आनंद
‘दिव्य मराठी’शी बोलताना वेदालंकार म्हणाले, संगीत नाटक हे मराठी भाषेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. अशी कलाकृती इतरत्र कुठेही नाही. त्यामुळे संगीत नाटकांचा अनुवाद हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा, असे वाटले. सुरुवात संगीत सौभद्रपासून केली. त्याचे कथानक पौराणिक असल्याने ते परिचित आहे. मात्र, संगीत शारदा हिंदीमध्ये करताना अधिक आनंद मिळाला, कारण तो विषय (जरठकुमारीविवाह) हिंदीभाषक पट्टय़ात अधिक संवेदनशील ठरेल.