आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Youth Do Something For Arunachal Pradesh: Brink Into Mainstream

मराठी तरुण करताहेत अरुणाचलमध्ये मार्गदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - निसर्गाचे वरदान लाभलेल्या अरुणाचल प्रदेशातील युवक सध्या पाश्चात्त्यीकरणाच्या प्रभावाखाली येत असल्याने भरकटत आहे. मात्र, तेथील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सेवाभारती’ संस्थेच्या सहकार्याने पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’चे 14 युवक तेथील युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. या विद्यार्थ्यांनी इटानगर, तेजू, पासीघाट, अलाँग व सेपा या शहरांत सुमारे 200 युवकांसाठी नुकतीच आठ दिवसांची शिबिरे घेतली.

तेजू या ठिकाणी गेलेल्या शार्दूल मनोरकर व प्रदीप मिरसे या विद्यार्थ्यांनी सांगितले की, अरुणाचलमध्ये 21 मोठ्या, तर 87 छोट्या जमाती आहेत. त्यापैकी मिशमी ही जमात माझ्या भागात होती. त्यांची पहिलीच पिढी शिकणारी असल्याने भविष्यात काय करावे याबाबत हे विद्यार्थी संभ्रमित आहेत. बारावीनंतर बहुतांशी मुले रस्ते अथवा लाकडांचे काँट्रॅक्ट घेऊन उदरनिर्वाह करतात. निवडणुकीच्या माध्यमातून पैसे उकळण्यासाठी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, शिक्षणाचा प्रसार हवा तसा होत नाही. वीज, रस्ते, रोजगाराचाही अभाव आहे.
मुला-मुलींत भेद नाही : इटानगर येथे गेलेली सोनम देशमुख म्हणाली, अरुणाचलमध्ये विविध जाती-जमाती असून कोणत्याही जमातीत मुलगा-मुलगी भेदभाव होत नाही. शिक्षण घेण्यात मुलींची संख्या वाढत आहे.

शिक्षक, पुस्तकांची टंचाई


सेपाला गेलेला अभिषेक पानसरे म्हणाला, सेवाभारतीचे कार्यकर्ते हृषीकेश दिवेकर यांच्या माध्यमातून आम्ही येथील विद्यार्थ्यांना यूपीएससी व अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. सामान्यज्ञान व गणिताचे (सी-सॅट) अभ्यास कौशल्यांचे टप्पे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, काही पुस्तके, टिपणेही दिली. अभ्यास नियोजन, पेपर वाचनाची माहिती दिली,’ असे पासीघाटला गेलेला प्रसाद माळी याने सांगितले. येथील युवकांना शिक्षणाची आवड आहे, परंतु दर्जेदार पुस्तकांची कमतरता, शिक्षकांची कमी व वीजटंचाई या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते, असे अलाँगला गेलेल्या शोभन बडगुजरने सांगितले.

दीर्घकालीन उपक्रमाचा विचार
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षेचे संचालक डॉ. विवेक कुलकर्णी म्हणाले, अरुणाचल प्रदेशला गेलेले विद्यार्थी यूपीएससी मुलाखतीची तयारी करत असून त्यांना जाण्यापूर्वी शिकवण्याच्या विविध पद्धतींविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच तेथील परिस्थितीबाबत माहिती दिली होती. अशा प्रकारचा उपक्रम अरुणाचलमध्ये प्रथमच राबवण्यात आला व त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात अशा प्रकारचा दीर्घकालीन उपक्रम राबवण्याबाबत विचार केला जात आहे.