आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा, विदर्भात पा-याने गाठली चाळिशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दुष्काळाची तीव्रता अधिक वाढवणा-या उन्हाच्या झळा आता मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जाणवू लागल्या असून, अनेक ठिकाणी पा-याने चाळिशी ओलांडली आहे. कमाल तापमान चाळीस अंशांपर्यंत पोचले असून येत्या आठवड्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.


शुक्रवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 40.8 अंश, तर सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे 16.8 अंश इतकी झाली. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईचा सामना मार्चपासून करणा-या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पा-याने चाळिशी गाठली आहे. विशेषत: सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, चंद्रपूर, वर्धा तसेच नागपूर, ब्रह्मपुरी, अमरावती, जळगाव आदी ठिकाणी पारा सरासरी 40 वर आहे. उन्हाळ्याचे एप्रिल आणि मे असे दोन पूर्ण महिने अद्याप बाकी आहेत. हवामान खात्यानुसार येत्या आठवडाभरात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तापामानात वाढ होणेच अपेक्षित आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागात मात्र तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. ढगाळ हवानामाचा परिणाम म्हणून तापमान किंचित घसरले असले तरी दमटपणा वाढत चालला आहे तसेच कमाल आणि किमान तापमानातील अंतर कमी होत असल्याने एकूण उकाड्यात भरच पडण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
औरंगाबाद 36.4
जळगाव 38.7
सोलापूर 40.2
नगर 29
पुणे 35. 7
मुंबई 31
नांदेड 40.5
नागपूर 39.6