आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Bureau Sadguru Group Pune News In Marathi

नवे काही: गुरुजींच्या शुभमंगलसाठी 'सद्‍गुरू'चा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आयुष्यभर ताराबलं चंद्रबलं तदेव.. असे म्हणत अनेक वधू-वरांचे शुभमंगल लावणाऱ्या गुरुजी मंडळींना सध्या स्वत:च्या शुभमंगलाची मंगल घटिका कधी येणार, असा प्रश्न पडला आहे. समाजातील विविध स्तरांत पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींविषयी अकारण गैरसमज पसरल्याने गुरुजींची संस्था स्थापन 'सद्‍गुरू' या संस्थेने वधू संशोधन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यभरात पूर्णवेळ पौरोहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या हजारोंची आहे. एकट्या पुण्यातच पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची संख्या ७०० हून अधिक आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पूर्णवेळ पौरोहित्याचा व्यवसाय करणाऱ्या गुरुजींना स्वत:च्या विवाहाची घटिका गाठण्यासाठी मेळाव्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. केवळ याच कारणासाठी व्यावसायिक पौरोहित्य करणाऱ्यांची "श्रीसद्‍गुरू ग्रुप' या नावाने रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. पौरोहित्य हीच उपजीविका असणाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्यामध्ये गुरुजींसाठी वधू शोधणे, हे मुख्य काम बनले आहे.

यासंदर्भात ग्रुपचे सहसचिव वासुदेव जोशी गुरुजी म्हणाले, संस्था फक्त एक वर्षाची आहे, पण सदस्य संख्या ११०० हून अधिक झाली आहे. वैद्यकीय सेवांची उपलब्धता, विविध कारणांसाठी बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी (कारण गुरुजी पे स्लीप दाखवू शकत नाहीत) आणि उपवर गुरुजींना वधू शोधण्यात येणाऱ्या अडचणी, यासंदर्भात संस्था काम करते.
संस्थेने आयोजित केलेल्या पुरोहितांसाठीच्या वधू-वर मेळाव्यासाठी तब्बल ४५० हून अधिक गुरुजींनी नावनोंदणी केली आहे. अशा प्रकारचा वधू-वर मेळावा प्रथमच होत असून साऱ्या पुरोहित वर्गात याविषयी उत्सुकता आहे.

हे आहेत गैरसमज...
>पौरोहित्य करणाऱ्यांचे उत्पन्न कमी वा नगण्य असते.
>गुरुजी मंडळी चांगली शिकलेली नसतात.
>गुरुजी मंडळी फक्त धोतर, टोपीत असतात.
>आधुनिक जीवनशैलीला सुसंगत आचरण गुरुजी करू शकत नाहीत.
>टेक्नोसॅव्ही युगाशी त्यांचा संबंध नसतो.

गैरसमजांचे निराकरण करणारे वास्तव...
>पौरोहित्य करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न सरासरी
३० ते ७५ हजारांपर्यंत.
>आताचे बहुतेक गुरुजी पदवीधर, द्विपदवीधर.
>युवा गुरुजी फक्त पौरोहित्य करताना पारंपरिक वेश परिधान करतात, एरवी तेही नव्या पिढीसारखेच कपडे वापरतात.
>युवा गुरुजींनी टेक्नॉलॉजी आत्मसात केली आहे. ते रोजचे काम मोबाइल, ई –मेल्सद्वारे करतात.