आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेरानचे एमटीडीसी केंद्र पुन्हा सज्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - झुकझुक करत जाणा-या टॉय ट्रेनची मजा घेत नेरळ ते माथेरानचा निसर्गरम्य प्रवास करणा-या पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरानचे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आता नव्या रूपात सिद्ध होत आहे. आगामी उन्हाळी हंगामासाठी हे सुंदर विश्रामगृह पर्यटक आरक्षित करू शकणार आहेत.
थंड हवेचे ठिकाण म्हणून देश-विदेशात ख्याती असलेल्या माथेरानला बहूसंख्य पर्यटकांची पसंती असते. या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी यासाठी पर्यटन महामंडळाने तेथील निवासस्थानांचे नुकतेच नूतनीकरण केले. यासंदर्भात एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक नयना बुंदारडे म्हणाल्या की, गेली तीन वर्षे माथेरानचे दस्तूर नाका येथील शासकीय विश्रामगृह नूतनीकरणासाठी बंद होते. हे विश्रामगृह नेरळ-माथेरान या रस्त्यावरच असल्याने पर्यटकांसाठी अधिक सोयीचे ठरणार आहे.
माथेरान विश्रामगृहाचे काम पाहणारे अभियंता दीपक हर्णे म्हणाले, गेली तीन वर्षे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह ही मूळ हेरिटेज इमारत आहे. त्यामुळे हेरिटेज समितीच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरणाचे काम सुरू होते. माथेरानचे स्थान लक्षात घेता बांधकाम साहित्य, मजूर आणि अन्य उपलब्धतांची सोय करण्यास विलंब होत गेला. शिवाय पावसाळ्यात इथे काम करता येत नाही. या अडचणींवर मात करून हे विश्रामगृह आता सज्ज झाले असून येत्या उन्हाळी हंगामात त्याचे आरक्षण करणे शक्य होईल. जुन्या वास्तूमधील फ्लोअरिंग, छप्पर, स्वच्छतागृहे, काही ठिकाणी होणारी गळती हे सारे दुरुस्त करण्यात आले आहे. 34 खोल्या आता या विश्रामगृहात पर्यटकांसाठी सुसज्ज करण्यात आल्या आहेत.
राजेशाही पाहूणचार
माथेरानच्या विश्रामगृहानजीकच्या श्रुती व्हिला या सुंदर इमारतीत पर्यटन महामंडळातर्फे सर्व सोयींनीयुक्त असे सात आलिशान रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. त्याही पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत. अर्थात तेथील राजेशाही पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी तशीच किंमतही मोजावी लागणार आहे, असे दीपक हर्णे यांनी सांगितले.