आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारी अडचणीत: माउलींच्या पालखीसाठी दिवे घाट अवघडच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लक्षावधी भाविकांना आकर्षित करणारा माउलींचा पालखी सोहळा चार दिवसांवर ठेपला असताना, आळंदी ते पंढरपूर मार्गावरील सर्वात खडतर समजला जाणारा दिवे घाटाचा टप्पा यंदाही अवघडच राहणार असे चित्र आहे. वारंवार सांगूनही हडपसर ते सासवड या मार्गावरील अतिक्रमणे, कच-याचे ढीग, सांडपाण्याचे ओघळ आणि घाटातील दरडींची समस्या कायमच आहेत.

माउलींचा पालखी सोहळा १० आणि ११ जुलै रोजी पुण्यात मुक्कामाला आहे. त्यानंतर वारीतील सर्वात कठीण टप्पा हा पुणे ते सासवड हाच आहे. २७ किलोमीटर लांबीचा हा टप्पा वारीच्या एकूण वाटचालीतला सर्वात अवघड आणि मोठ्या अंतराचा टप्पा आहे. विशेषत: सासवड गाठण्यापूर्वी माउलींची पालखी अवघड वळणांच्या दिवे घाटातून मार्गक्रमण करते. तेव्हा वारक-यांची कसोटी लागते.

रखडलेले रुंदीकरण
दिवे घाटाचे रुंदीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे अरुंद रस्ता, कोसळणा-या दरडींचा धोका, खचलेला रस्ता, जागोजागी पडलेले खड्डे अशा संकटांचा सामना माउलींच्या पालखी सोहळ्याला दिवे घाट पार करताना करावा लागणार आहे. सत्यपुरम ते दिवे घाट या दरम्यान वारीचे निमित्त साधून अनेकांनी आपली तात्पुरती दुकाने उघडली आहेत. या अरुंद रस्त्यावर अवैध पार्किंगची समस्याही प्रचंड आहे. सत्यपुरम, भेकराईनगर, जकातनाका, पॉवर हाऊस, मंतरवाडी दरम्यानचा रस्ता सांडपाणीमय झाला आहे. जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. वारी चार दिवसांवर आली तरी साफसफाईचे काम सुरू झालेले नाही. दिवे घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे बसवण्याची मागणीही अपूर्ण आहे. खोदलेला रस्ता, अर्धवट भरलेले खड्डे, रस्त्यावरच पडलेले खडी, मुरुमाचे ढीग यांची भर या समस्या अधिक तीव्र करणारी आहे, अशी तक्रार परिसरातील कार्यकर्त्यांनी केली आहे.