पुणे- मूळच्या चेन्नईमधील नेहा हेपाटे या डॉक्टर तरूणीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. पिंपरीतील डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारी नेहा कॉलेजच्या वसतीगृहात राहत होती. नेहाने एमबीबीएस शिक्षण घेतले होते. सध्या ती मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत होती.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी वाय पाटील मुलींच्या वसतीगृहात नेहा राहत होती. रविवारी रात्री नेहाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर सोमवारी सकाळी नेहा हॉस्टेलच्या रूममधून बाहेर न आल्याने तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. सुरक्षारक्षकाने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर नेहाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
नेहा मागील काही दिवसापासून तणावात वावरत होत्या असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र, नेहाच्या रूममध्ये कोणतेही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यामुळे पोलिस चौकशी करीत आहेत. नेहा मूळची चेन्नईची असल्याने तिचे कुटुंबिय आल्यानंतरच तिचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.