आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब मुलाला हाकलले, पुण्यात मॅकडोनाल्डवर शेण फेकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रस्त्यावरच्या गरीब मुलाने मागितलेले सॉफ्टड्रिंक नाकारून त्याला हाकलून देणा-या मॅकडोनाल्ड या हायफाय फास्ट फूड रेस्तराँवर शनिवारी संतप्त जमावाने सायंकाळी शेण-चिखलाचा मारा केला. तसेच ‘गरिबांचे शोषण करणे बंद करा’ अशा घोषणाही दिल्या. घटनेनंतर संचालकांनी शनिवारी रेस्तराँ बंदच ठेवले. मॅकडोनाल्डचे कर्मचारी गरीब लोकांना रेस्तराँमध्ये येऊ देणार नाहीत का, असा सवाल एका महिलेने फेसबुक पोस्टवर केला आहे. रेस्तराँविरुद्ध कारवाईचीही मागणी केली आहे. शनिवारीच्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

शाहिना अतरवाला यांनी १० जानेवारी रोजीची ही घटना फेसबुक वॉलवर शेअर करताना लिहिले आहे की, दोन दिवसांपूर्वी आपण मित्रांसह पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील मॅकडोनाल्ड रेस्तराँमध्ये गेलो होते. तेथून जात असताना फुटपाथवर आकाश पवार या मुलाने त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे मागितले. पैसे न देता खाण्यापिण्यासाठी काहीतरी द्यावे म्हणून आपण त्याला घेऊन रेस्तराँमध्ये गेलो. तेथे आकाशने सॉफ्टड्रिंक मागितले. ते घेण्यासाठी आपण रांगेत उभे असताना मॅकडोनाल्डच्या कर्मचा-यांनी या गरीब मुलाला थेट हाकलत हात धरून बाहेर काढले.
शाहिना यांनी बाहेर आल्यानंतर आकाशला सॉफ्टड्रिंक दिले. त्यांनी आकाशसोबत आपला फोटो व रेस्तराँचे बिलही फेसबुकवर पोस्ट केले. आकाश रेस्तराँबाहेर फुगे विकतो. या घटनेच्या विरोधात संतप्त जमावाने शनिवारी घोषणाबाजी करत मॅकडोनाल्डवर शेण व चिखलफेक केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.

सीएमचा हस्तक्षेप
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी रेस्तराँचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज जप्त केले आहे. दरम्यान, कंपनी कुणासोबतही भेदभाव करत नाही, आम्ही घटनेची चौकशी करू, अशी सारवासारव मॅकडोनाल्डने केली आहे.

आधीही अशीच आगळीक
मॅकडोनाल्डवाले फक्त हायफाय श्रीमंतांनाच प्रवेश देतात. इतरांना हाकलतात अथवा अपमानास्पद वागवतात. याचे उदाहरण गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातही घडले होते. कार्यकर्त्यांनी संपूर्ण बिल भरून खाणे मागवल्यावरही रेस्तराँच्या कर्मचा-यांनी 'तुम्ही येथे बसू शकत नाही' असे म्हणत त्यांना हाकलले होते. याच दुकानासमोर गेल्या वर्षी एक बॉम्बस्फोट झाला होता.