आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेधा खाेले विक्षिप्त- शेजाऱ्यांचा आरोप, सोवळ्यातला स्वयंपाक बाटवल्याने पोलिस तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले. - Divya Marathi
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले.
पुणे- जात आणि वैवाहिक स्थितीबद्दलची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल पुण्यातल्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवामान खात्यातील संचालिका डॉ. मेधा खोले यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली हाेती. दरम्यान, खाेले यांच्या या भूमिकेवर राज्यभरातून टीका हाेत असून पुण्यात शुक्रवारी काही संघटनांनी त्यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली.  दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या निर्मला यादव (वय ८०) यांनी आरोप फेटाळले आहेत. ‘डॉ. खोले यांची मी फसवणूक केली नाही’, असा दावा करत त्यांनीही खाेले यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

डॉ. खोले यांच्या फिर्यादीनुसार, गौरी-गणपती व  आई-वडिलांचे श्राद्ध या कार्यक्रमासाठी  त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राह्मण महिला हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक महिला स्वयंपाकासाठी आली. तिने तिचे नाव ‘निर्मला कुलकर्णी’ असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. खोले यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन चौकशी केली. तेव्हाही सदर महिलेने त्या ब्राह्मण व सुवासिनी असल्याचे सांगितले. खात्री पटल्यानंतर डॉ. खोले यांनी गेल्या वर्षी गणपतीत आणि श्राद्धाचा सोवळ्यातील स्वयंपाक निर्मला यांच्याकडून करवून घेतला. मात्र, नंतर त्यांना सदर महिला ‘ब्राह्मण’ नसल्याचे कळले.  खोले यांनी पुन्हा त्या महिलेच्या घरी जाऊन चौकशी केली व खाेटे बाेलल्याबद्दल निर्मला  यांना जाब विचारला. या वेळी झालेल्या वादात ती महिला अंगावर धावून आली. तिने धार्मिक भावना दुखावल्या. माझे १५ ते २० हजारांचे नुकसान केले’, असे डॉ. खोले यांनी  फिर्यादीत म्हटले आहे.  

खोले विक्षिप्तच
शेजाऱ्यांची तक्रार  डॉ. खोले विक्षिप्त असल्याची तक्रार त्या राहत असलेल्या शिवाजीनगर येथील सीतापार्क सोसायटीतल्या रहिवाशांनी केली आहे. खोले त्यांच्या बहिणीसमवेत या सोसायटीत राहतात. दोघीही अविवाहित आहेत.  सोसायटीतल्या कामांमध्ये त्या आडकाठी आणतात. याबाबत खोले यांच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्याची माहिती परदेशींनी दिली. खोले यांनीही आमच्याविरोधात तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. शेजाऱ्यांशी त्या नेहमी वाद घालतात.  अनेकदा रात्री १२ वाजता केस मोकळे सोडून जिन्यावर  अंधारात बसलेल्या असतात, त्यामुळे रात्री- बेरात्री कामावरून येणाऱ्यांना भीती वाटते, अशीही रहिवाशांची तक्रार आहे.

ब्राह्मण महासंघाची भूमिका
खोले आणि निर्मला यादव यांच्यातले वाद घरगुती आहेत. ७०-८०  वर्षांची परंपरा मोडल्यामुळे खोले यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील. पण त्यांनी सामोपचाराने वाद मिटवावेत. सोवळ्याचा अर्थ स्वच्छता आणि शुचिर्भूतपणाशी आहे. सोवळे म्हणजे जातीयता नव्हे. जातीय भूमिकेचे समर्थन आम्ही करत नाही. इतरांनीही या वादाला जातीय रंग देऊ नये,’ असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा, शेकाप,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डाॅ. खाेले यांच्याविराेधात पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. दुसरीकडे समस्त हिंदू आघाडी,  राजे शिवराय प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद,  बजरंग दल, लोकशाही जागर मंच, शिवसमर्थ प्रतिष्ठान. शिववंदना ग्रुप, अभिनव निर्माण प्रतिष्ठान,  हिंदू महासभा अादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही डाॅ. खाेले यांचा निषेध केला. त्यांनी यादव यांची माफी मागावी अशी मागणीही केली.
 
उशिरा झाली उपरती
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यावा यासाठी भांडणाऱ्या डॉ. मेधा खोलेंना रात्री उशिरा त्यांच्या चुकीची उपरती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मानसिक ताणाच्या भरात निर्मला यादव यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासंदर्भात त्यांनी विचारणा केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात डॉ. खोले यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत तक्रार मागे घेतली नव्हती.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती...
बातम्या आणखी आहेत...