आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे \'सोवळं\' प्रकरण: मेधा खोलेंकडून मोलकरीण महिलेविरोधातील तक्रार अखेर मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोहोबाजूने टीकेचा भडीमार सहन करावा लागल्यानंतर डॉ. मेधा खोलेंनी अखेर शनिवारी सायंकाळी मोलकरीन निर्मला यादव यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. - Divya Marathi
चोहोबाजूने टीकेचा भडीमार सहन करावा लागल्यानंतर डॉ. मेधा खोलेंनी अखेर शनिवारी सायंकाळी मोलकरीन निर्मला यादव यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली.
पुणे- चोहोबाजूने टीकेचा भडीमार सहन करावा लागल्यानंतर डॉ. मेधा खोलेंनी अखेर शनिवारी सायंकाळी मोलकरीन निर्मला यादव यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. मेधा खोलेंनी तक्रार मागे घ्यावी व दाखल झालेला गुन्हा रद्द करावा यासाठी ब्राह्मण महासंघासह अनेकांनी प्रयत्न चालवले होते. गेली दोन दिवस यावर काथ्याकूट होत असल्याने अखेर मेधा खोलेंनी तक्रार मागे घेतली. दरम्यान, निर्मला यादव यांनी खोलेविरोधात दाखल केलेली तक्रार अद्याप मागे घेतलेली नाही.
 
जात आणि वैवाहिक स्थितीबद्दलची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल पुण्यातल्या निर्मला यादव या 80 वर्षाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हवामान खात्यातील माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी यासंदर्भात बुधवारी फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, खोले यांच्या या भूमिकेवर राज्यभरातून मोठी टीका झाली. पुण्यात शुक्रवारी काही संघटनांनी त्यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली. सोशल मिडियातूनही यावर जोरदार चर्चा घडली. सर्वच स्तरातून यावर होत असल्याचे पाहून ब्राह्मण महासंघासह काहींनी हे प्रकरण समोपचाराने मिटावे यासाठी प्रयत्न केले. त्यातच गुन्हा दाखल झालेल्या निर्मला यादव यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण डॉ. खोले यांची मी फसवणूक केली नाही असा दावा करत त्यांनीही खोले यांच्याविरोधात तक्रार दिली. यानंतर या प्रकरणाला जातीय वळण मिळू लागले. 
 
खोलेंना उशिरा उपरती-
 
- पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यावा यासाठी भांडणाऱ्या डॉ. मेधा खोलेंना दोन दिवसांनी आपल्या चुकीची उपरती झाली. 
- मानसिक ताणाच्या भरात निर्मला यादव यांच्याविरोधात आपण तक्रार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, डॉ. खोलेंनी याबाबत अधिकृत किंवा जाहीर कोणतेही भूमिका मांडली नाही. 
 
मेधा खोले विक्षिप्तच, शेजा-यांशी वाद घालतात- सोसायटीची तक्रार
 
- डॉ. मेधा खोले विक्षिप्त असल्याची तक्रार त्या राहत असलेल्या शिवाजीनगर येथील सीतापार्क सोसायटीतल्या रहिवाशांनी केली आहे. 
- खोले त्यांच्या बहिणीसमवेत या सोसायटीत राहतात. दोघीही अविवाहित आहेत. सोसायटीतल्या कामांमध्ये त्या आडकाठी आणतात.
- याबाबत खोले यांच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्याची माहिती परदेशींनी दिली. खोले यांनीही आमच्याविरोधात तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. 
- शेजाऱ्यांशी त्या नेहमी वाद घालतात. अनेकदा रात्री 12 वाजता केस मोकळे सोडून जिन्यावर अंधारात बसलेल्या असतात, त्यामुळे रात्री- बेरात्री कामावरून येणाऱ्यांना भीती वाटते, अशीही रहिवाशांची तक्रार आहे.
 
ब्राह्मण महासंघाची वाद मिटविण्याची भूमिका-
 
- खोले आणि निर्मला यादव यांच्यातले घरगुती वाद चव्हाट्यावर आले आहेत. परंपरा मोडल्यामुळे खोले यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील. पण त्यांनी सामोपचाराने वाद मिटवावेत. 
- सोवळ्याचा अर्थ स्वच्छता आणि शुचिर्भूतपणाशी आहे. सोवळे म्हणजे जातीयता नव्हे. जातीय भूमिकेचे समर्थन आम्ही करत नाही. 
- या प्रकरणाला या वादाला जातीय रंग देऊ नका असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केले होते.
 
खोलेंविरोधात निदर्शने व निषेध-
 
- सोवळं प्रकरणाला जातीयतेचा रंग लागताच मराठा क्रांती मोर्चा, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. खोले यांच्याविरोधात पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. 
- त्याच वेळी समस्त हिंदू आघाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, लोकशाही जागर मंच, शिवसमर्थ प्रतिष्ठान. शिववंदना ग्रुप, अभिनव निर्माण प्रतिष्ठान, हिंदू महासभा आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉ. खोले यांचा निषेध केला. 
- मेधा खोलेंनी 80 वर्षीय निर्मला यादव यांची माफी मागावी अशी मागणीही विविध संघटनांनी केली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, डॉ. मेधा खोलेंनी केलेली तक्रारीचा नमुना...
बातम्या आणखी आहेत...