आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medha Patkar Challenges Geological Survey Of India (GSI)

आदिवासींना हटवून डोंगर लाटण्याचा डाव; मेधा पाटकर यांची शरद पवारांवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘डोंगरी खोर्‍यांमध्ये पिढय़ानपिढय़ा राहणार्‍या आदिवासींना हुसकावून हे डोंगर उद्योगपतींच्या घशात घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. शरद पवारांना आणखी 26 ‘लवासा’ राज्यात उभारायचे आहेत. त्याचा हा भाग दिसतो,’ अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

माळीण दुर्घटनेनंतर डोंगरी गावांमधील लोकांचे स्थलांतर करण्याची सूचना राज्य सरकारला करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. या संदर्भात पाटकर म्हणाल्या की संधी साधून पुनर्वसनाच्या नावाखाली लोकांना हुसकवायचे आणि मोकळ्या झालेल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायच्या, ही विकृत मानसिकता आहे. मात्र डोंगरी खोर्‍यावर पहिला अधिकार आदिवासींचाच आहे. त्यांना वगळून विकासाची भूमिका घेता येणार नाही,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र., पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी उपस्थित होते.

लवासाचे ‘माळीण’ होईल
कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार लवासातील सर्व गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहेत. पर्यावरणाच्या सर्व निकषांची पायमल्ली करून या ठिकाणी दोन हजार हेक्टरवर कामे सुरूआहेत. बेसुमार वृक्षतोड आणि टेकड्या फोडून केलेल्या कामांमुळे लवासा परिसरातील 20 गावांना धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या काळात या गावांनाही ‘माळीण’सारखाच धोका उत्पन्न होऊ शकतो, अशी भीती डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली.

पश्चिम घाटाच्या सर्वेक्षणाची गरज
माळीण गावातील दुर्घटनेचा अभ्यास करून ‘जीआयएस’ने प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्याने तूर्तास काळजीचे कारण नाही. ‘संपूर्ण पश्चिम घाट परिसराचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. हिमालयानंतर मध्य भारताचे पठार आणि निलगिरी पर्वत या प्रदेशाची पाहणी केली जाणार आहे. या परिसरात बांधकामे करताना शाश्वत विचाराची गरज आहे,’ असे सांगून ‘जीआयएस’चे सहा यांनी पाटकर यांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोराच दिला आहे.

काय म्हणाले पवार?
‘लवासा सिटी’सारखे आणखी 26 प्रकल्प राज्यात सुरू होऊ शकतात. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल, परंतु त्यासाठी विकासाकडे पाहण्याचा मानसिक दृष्टिकोन बदलावा लागेल. माध्यमांनीही विकासाच्या आड येणार्‍या घटकांना अवास्तव प्रसिद्धी देऊ नये. प्रकल्पविरोधी घटकांना प्रसिद्धी दिल्यामुळे विकास रखडतो’, असे शरद पवार 23 जून रोजी पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉर्मसच्या कार्यक्रमात बोलले होते.

शरद पवार- मोदींच्या हातमिळवणीची शंका
माळीण दुर्घटनेमुळे पश्चिम घाटातील पर्यावरण, जैवविविधता आणि सामाजिक संपत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम घाटासंबंधी डॉ. गाडगीळ समितीने दिलेला अहवाल स्वीकारून त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. लवासा उभारणारे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची हातमिळवणी आहे का?’ हे लवकरच पाहायला मिळेल, असे पाटकर म्हणाल्या.