पुणे - प्रसूतीसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल झालेल्या अहमदनगर येथील एका महिलेच्या जिवाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे धोका निर्माण झाला आहे. प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटात दीड किलो वजनाचा सर्जिकल मॉप राहिला होता. पाच-सहा महिन्यांनंतर हा प्रकार लक्षात आला, तोपर्यंत या महिलेला वंध्यत्व आले होते. या प्रकारामुळे पतीने आपल्याला सोडून दिल्याची व्यथा पीडित महिलेने बुधवारी मांडली.
संगीता (वय 30, नाव बदलले आहे) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एप्रिल 2013 मध्ये मी नऊ महिन्यांची गर्भवती होते. पुण्यातील मगरपट्टा भागातील नोबेल रुग्णालयात मला प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.वैशाली चव्हाण यांच्या देखरेखीखाली माझ्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी सिझेरियन केले, मला मुलगा झाला. मात्र ऑपरेशनदरम्यान डॉक्टर अतिशय अनौपचारिकरीत्या बोलून कामाकडे दुर्लक्ष करत होत्या. प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी मला घरी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर माझ्या पोटात असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांना वारंवार उपचाराची विनवणी करूनही त्यांनी साधी औषधे देऊन बोळवण केली.
पोटदुखीचा त्रास सुरू असतानाच, मी नगर येथे माहेरी गेल्यावर तेथील डॉक्टर हेमंत देशपांडे यांच्याकडे तपासणी केली. त्यांनी मला तातडीने पोटाची शस्त्रक्रिया तातडीने करावी लागेल, असे सांगितले. ऑक्टोबर 2013 मध्ये मी शस्त्रक्रिया करून घेतली तेव्हा माझ्या पोटातून दीड किलो वजनाचा सर्जिकल मॉप काढण्यात आला. या काळात पोटात इन्फेक्शन झाल्याने उजव्या बाजूची ओव्हरी व फॅलोपियन ट्यूब कायमस्वरूपी काढून टाकण्यात आली. परिणामी मला वंध्यत्व आले. या घटनेमुळे माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम झाल्याची व्यथा संगीताने बोलून दाखवली.
पोलिसांकडूनही टाळाटाळ
डॉ. वैशाली चव्हाण व डीन डॉ. दिलीप माने यांना मी भेटले असता, त्यांनी चुकीची जबाबदारी टाळत अपमानास्पद वागणूक दिली. या निष्काळजी डॉक्टरांविरोधात मी हडपसर पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागितली आहे, असे पीडित महिलेने सांगितले. याबाबत डॉ.वैशाली चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.