आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसोबतच्या घटस्फोटाला ‘स्वाभिमानी’चा नवा मुहूर्त, 26 जुलै रोजी निर्णयाचे सूतोवाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पुणे- ‘भाजपला मदत केल्याचा एक हजार टक्के पश्चात्ताप होतो, पण कर्जमुक्तीसाठी त्यांच्या दारात कितीदाही जाण्याची तयारी आहे. सातबारा कोरा होणारे ४० लाख भाग्यवान शेतकरी कोण याची यादी सरकारने वेबसाइटवर प्रसिद्ध करावी, अन्यथा २६ जुलैला ‘आरपार’चा निर्णय घेण्यास आम्ही मोकळे आहोत,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी पुण्यात दिला.  
 
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या वेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याची चर्चा झाली. ३४ हजार कोटींची सरकारची कर्जमाफी फसवी असून फार कमी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष या वेळी उपस्थित होते.  
 
‘एकूण ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा काही ना काही लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना मिळेल, असे सरकारने सांगितले. पण त्यांची ही आकडेवारी संशयास्पद वाटते. 
 
याबद्दल जिल्हावार अभ्यास करून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारू. कर्जमाफीवर समाधान न झाल्यास २६ जुलैला भाजपपासून फारकत घेण्याचा पर्याय आम्हाला खुला आहे,’ असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. द्राक्ष, डाळिंब उत्पादक तसेच पॉलिहाऊसमध्ये उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त असते. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.
 
आकड्यांचा गोलमाल आणि संभ्रम 
‘मुळात राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील आकडे संशयास्पद आहेत. राज्याचे उत्पन्न ५३ हजार कोटी आहे. पगार, व्याज व इतर आवश्यक खर्च वगळता ४२ हजार कोटी रुपये शिल्लक राहतात. शेतकऱ्यांवरील दरडोई कर्ज ५४ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. कर्जदार शेतकरी १ कोटी १५ लाख आहेत. हा गुणाकार केला तर कर्जाची रक्कम ६० हजार कोटींपेक्षा जास्त होत नाही. मग शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सव्वा लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम लागेल, असे सरकार कशाच्या आधारावर म्हणते? त्यामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे सांगणाऱ्या सरकारने संपूर्ण आकडेवारी दिल्याशिवाय चर्चा करता येणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...