आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चळवळीचा आध्यात्मिक अधिष्ठाता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांची चळवळ ही शरद जोशींच्या मते स्वातंत्र्य चळवळीसारखीच होती आणि व्यष्टीप्रमाणेच समष्टीच्या स्वातंत्र्याची जपणूकही त्यांना अगत्याची वाटत होती. हे व्यक्ती किंवा आत्मस्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचाच एक भाग म्हणून हा झुंझार लोकनेता आयुष्याच्या एका वळणावर नर्मदा परिक्रमेला निघाला. दुर्दैवाने हृदयाचे दुखणे आल्याने त्यांना हा प्रवास अर्ध्यावरच सोडून परत यावे लागले. परंतु अडचणींवर मात करणे, हा त्यांचा स्वभावच असल्याने उपचार पूर्ण होऊन पुरेशी विश्रांती होताच त्यांनी अर्धवट राहिलेली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. तत्पूर्वी पूर्वतयारी म्हणून त्यांनी विपश्यनेचे एक शिबिर केले होते, अशी आठवण विपश्यनेचे गुरू रवी वेदांत यांनी सांगितली.

कालांतराने शरद जोशी यांनी इगतपुरी येथील केंद्रातही विपश्यनेचे शिबिर केले. शेतकरी चळवळीचा जोर ओसरत असताना या चळवळीला व्यक्तिस्वातंत्र्यवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, पण तो नेमक्या कशा पद्धतीने मांडला पाहिजे, याविषयी त्यांच्या मनात काही संभ्रम असल्याचे जोशी म्हणाले होते, असा उल्लेख रवी वेदांत यांनी केला. जोशी स्वभावत: बुद्धिप्रामाण्यवादी होते. तर्कसुसंगत विचार त्यांच्याजवळ होता. शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा होता. तरीही ‘माझी चळवळ भौतिकवादी आहे. मी मालाला भाव हवा म्हणून लढतो आहे. शेतकऱ्याची गरिबी दूर व्हावी या प्रयत्नात आहे. मला शेतकऱ्याचे स्वातंत्र्य हवे आहे,’ ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. फक्त या भूमिकेचे आध्यात्मिक अधिष्ठान, त्या विचाराचा तात्त्विक पाया त्यांना घट्ट करायचा असावा म्हणून स्वत:शीच स्वत:चा संवाद घडावा म्हणून ते विपश्यनेला आले असावे, असे वेदांत म्हणाले.

सर्वसामान्य शिबिरार्थी
शरद जोशी मोठे नेते होते, पण शिबिरासाठी येताना त्यांचा सारा भौतिक मोठेपणा त्यांनी सहज बाजूला ठेवला होता. आश्रमात प्रवेशताना कुठल्याही माळा, धागे, गंडे, ताईत जवळ ठेवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना कायम त्यांच्या छातीशी बिलगलेला बिल्ला काढावा लागला. तो त्यांनी विनातक्रार काढला. सामान्य शिबिरार्थीप्रमाणे ते प्रवेशाच्या रांगेत उभे होते. तुम्ही काय करता? असे विचारल्यावर देशातल्या शेतकऱ्यांना अर्थशास्त्र शिकवतो, असे ते म्हणाले तेव्हा त्यांना ओळखून संबंधितांनी त्यांना स्पेशल ट्रीटमेंटची व्यवस्था केली. ती नाकारत शरद जोशी चारचौघांप्रमाणेच राहिले. फक्त माझी औषधे घेण्याची परवानगी मला द्या, अशी विनंती त्यांनी केल्याचे मला आठवते, असे वेदांत म्हणाले.

करुणा नव्हे, आनंद
मी जे काम करतो ते शेतकऱ्यांच्या करुणेपोटी करतो. ते करण्यात मला आनंद वाटतो. याविषयीचा त्यांचा संभ्रम या शिबिरात दूर झाला. मी करुणेपोटी नक्कीच काम करत नव्हतो, मला त्या कामात आनंद वाटत होता, समाधान मिळत होते, असे ते म्हणाले होते. त्यांच्याजवळ असणारी उच्च आध्यात्मिक मूल्येच त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मोठा नेता करण्यास कारणीभूत ठरली. याची सुस्पष्ट जाण त्यांच्यापाशी होती हेच त्यांच्यातल्या आध्यात्मिक बैठकीचे दृश्यरूप होते. पण जे मला कळले ते माझ्या शेतकरी बांधवांना कसे कळेल, हा विचार त्यांना सतत छळत होता. लोकशिक्षणात त्यांना आनंद होता. त्यापोटीच ते महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत भिंगरी लागल्यासारखे जागृती करत फिरत राहिले. संत नामदेवांनंतर बहुधा शरद जोशी हा एकच फकीर माणूस असेल, जो फक्त लोककल्याणासाठी भ्रमंती करत राहिला. त्यांच्या मनातल्या शंकांचे, संभ्रमांचे निराकरण हाच त्यांचा आत्मशोध असावा, असे म्हणावेसे वाटते.
धीरोदात्ततेचे दर्शन
वर्ध्याला सेवाग्राम येथे आश्रमासमोर संघटनेचे अधिवेशन असताना शरद जोशी भाषणाला उभे राहणार, एवढ्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचा निरोप आला. आम्ही साऱ्यांनी त्यांना त्वरित निघण्याचा सल्ला दिला. पण केवळ त्यांच्या हाकेसरशी आलेल्या विराट जनसमुदायाला प्रतिसाद न देताच निघून जाणे योग्य ठरणार नाही, हा विचार करून मनातला सगळा क्षोभ आवरून शरद जोशींनी नेहमीप्रमाणे विचार मांडले. भाषण पूर्ण केल्यावरच ते रवाना झाले. तेव्हा त्यांच्यातील धीरोदात्ततेचे घडलेले दर्शन चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अविस्मरणीय होते, अशी आठवण रवी वेदांत
यांनी सांगितली.
- जयश्री बोकील, पुणे