आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मायकेल जॅक्सन’ आता मराठीतही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विजेचा वेग धारण केलेली त्याची नृत्यशैली अद‌्भुत होती, तालासुरांचा सुसाट प्रवाह त्याच्या अस्तित्वातून वाहायचा आणि तार सप्तकातला त्याचा आवाज प्रेक्षक आणि श्रोत्यांच्या मनात आणि देहात अनामिक बेहोशी निर्माण करायचा.. दिवंगत ‘पॉप किंग’ मायकेल जॅक्सनचे असे वादळी चरित्र आता मराठी वाचकांसमोर येणार आहे.

‘मायकेल जॅक्सन : द मॅजिक अड मॅडनेस’ या मूळ जे. रॅन्डी ताराबोरेली लिखित चरित्राचा मराठी अनुवाद रेश्मा कुलकर्णी यांनी केला आहे. २५ जून रोजी पुण्यात या अनुवादाचा प्रकाशन समारंभ होणार आहे, अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी दिली.

‘जगभरच्या लाडक्या ‘पॉप किंग’चा एक कलाकार म्हणून आणि अर्थातच ‘एक वादग्रस्त व्यक्ती’ म्हणून करून दिलेला परिचय, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. वास्तव आणि दंतकथा यातील सीमारेषा धूसर करणारे त्याचे व्यक्तिमत्व आता मराठी भाषेत वाचकांना भेटणार आहे,’ असे मेहता म्हणाले.

जे रॅन्डी ताराबोरेली हे अमेरिकन पत्रकार, त्यांनी मूळ पुस्तकाचे लेखन केले आहे. मायकेल व ते वयाच्या १० व्या वर्षी एकमेकांना भेटले आणि मित्रत्वाच्या नात्याने मायकेलच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचे साक्षीदार बनले. वैयक्तिक आयुष्यात अनेक दिव्यांमधून जाणारा मायकेल दुसरीकडे सार्‍या जगाला आपल्या तालावर शेवटपर्यंत अक्षरश: नाचवत होता. या सार्‍या घटनांचे, त्यातील मायकेलच्या विक्षिप्त वागण्याचे रॅन्डी हे एकमेव विश्वासार्ह चरित्रकार आहेत. मूळ इंग्रजीतील पुस्तक अर्थातच बेस्ट सेलर आहे. भारतातही मायकेल जॅक्सनचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्रातही चाहत्यांची मोठी संख्या आहे, त्यांच्यापर्यंत या अनुवादातून मायकेल जॅक्सन पोहाेचणार आहे.

मायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी
पृष्ठसंख्या : ९३२
मूळ लेखक : रॅन्डी ताराबोरेली
अनुवादक : रेश्मा कुलकर्णी
एक कलाकार आणि विक्षिप्त माणूस म्हणून मायकेलचे चरित्र
जन्मापासून ते अकाली मृत्यूपर्यंतचा प्रवास समाविष्ट
बातम्या आणखी आहेत...