आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींविरोधात मी उभा राहिलो तर 100 टक्के ‘कार्यक्रम’- जयंत पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली/ पुणे- मी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात उभे राहायला घाबरतो, अशी हवा कुणीतरी करीत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी जर खरोखरच उभा राहिलो तर राजू शेट्टींचाच काय कुणाचाही 100 टक्के ‘कार्यक्रम’ करीन. मी कुणाही विरोधकांना घाबरत नाही, असे वक्तव्य ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. वाळवा व परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, खासदार राजू शेट्टी हे हंगामी पुढारी आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरला ते उगवतात व जानेवारीला मावळतात. निव्वळ राजकीय स्वार्थापोटी शेट्टी ऊस आंदोलन करतात. खासदार शेट्टींनी त्यांच्या मतदारसंघात काय कामे केली ते शेतक-यांनी व जनतेनी अभ्यासावीत. कोणताही नेता विविध प्रश्‍न सोडवणारा असावा, पण नुसताच आव आणणारा व बढाया मारणारा नसावा. आम्ही गेली अनेक वर्षे राजकारणात वावरत आहोत व जनतेला काय हवे याची आम्हाला नस माहिती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लोकांची अनेक कामे मार्गी लागली आहेत. दिलेले शब्द आम्ही पाळतो, कारण आम्हाला कायम जनतेजवळ जावे लागते व त्यांच्याच जिवावर आम्ही राजकारण, समाजकारण करतो. हे करेन, ते करेन, टिपरू नेऊ देणार नाही अशा बाता मारत शेतक-यांचे नुकसान करीत नाही, असे सांगत राजू शेट्टींवर हल्लाबोल चढविला.
जिल्हा परिषद निवडणुकीत वाळव्याच्या जनतेला चौकात पेव्हिंग ब्लॉक बसवतो म्हणून जो शब्द दिला तो त्याचवेळी पूर्ण केला. आज नऊ कोटी 64 लाखांची रस्त्याची कामे भूमिपूजन करून मार्गी लावलीत ती चांगल्या दर्जाची व लवकर व्हावीत म्हणून प्रयत्न करू. पण राजू शेट्टींनी काय केले? तुम्ही शेतकर्‍यांनी त्यांना निवडून दिले. पण, तुमचाच अपेक्षाभंग झाला. साखर कारखान्यांनी नेहमी शेतकर्‍यांच्या अपेक्षेनुसार 1800 दर मागितला असताना 2100 ते 2200 दर दिला. 2700 पेक्षा जास्त दर देता येत होता म्हणून दिला. जागतिकीकरण स्वीकारल्याने मागणी- पुरवठा, आयात-निर्यात आणि उत्पन्नावर साखरेचा दर ठरतो. तो कधी वाढतो तर खालीही येतो, याचे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. सरकारचे कोठे चुकत असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या, तेथून न्याय देण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत व करीत राहू पण खासदार राजू शेट्टी ऊसाचा दर ठरवित नाहीत, हे समजून घेतले पाहिजे असे सांगत राजू शेट्टींच्या आंदोलनात फरफटत जावू नका, असे आवाहन पाटील यांनी शेतक-यांना केले.
शेतकर्‍यांनी खासदार शेट्टींच्या घरावर मोर्चा काढावा- यंदा कारखाने 40 दिवस उशिरा सुरू झाले आहेत. त्याला राजू शेट्टी जबाबदार आहेत. शेतकर्‍यांच्या उसाला तुरे आले, उसाचे वजन घटले, लोकांचे ऊस उशिरा तुटले, परिणामी उशिरा पैसे मिळाले ते राजू शेट्टी यांच्यामुळेच. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढावा, असे जयंत पाटील म्हणाले.