आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minor Response For Ghuman Sahitya Samelaan From People

घुमानसाठी प्रतिनिधी नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद, महामंडळ मुदत वाढवण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठी साहित्य संमेलनाची दिंडी थेट पंजाबमधील घुमानला नेणाऱ्या साहित्य महामंडळाला अपेक्षित प्रतिनिधी नोंदणी होत नसल्याने मुदत वाढवण्याची वेळ आली आहे. 31 जानेवारी ही प्रतिनिधीनोंदणीची अंतिम तारीख असूनही अद्याप राज्यभरातून 500 जणांचीही नोंदणी झालेली नाही. महामंडळाच्या चारही घटक संस्थांमधून मिळालेल्या माहितीनुसार 28 जानेवारीपर्यंत अवघ्या 340 प्रतिनिधींनी घुमान संमेलनासाठी नोंदणी केली आहे. या विदारक चित्रानंतर प्रतिनिधी नोंदणीची मुदत किमान 15 दिवसांनी वाढवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
घुमान येथे एप्रिल 2015 मध्ये साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी प्रतिनिधींची नोंदणी साहित्य महामंडळातर्फे जाहीर करण्यात आली होती. घुमानपर्यंतचा दोन्ही वेळेचा प्रवास, जेवण, न्याहरी व निवास यासाठी प्रत्येकी 3 हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्यांना प्रवास आपापला करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी 1500 रुपये शुल्क आहे. मात्र महामंडळाच्या चारही घटक संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिनिधी नोंदणीला फारसा प्रतिसाद नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दिंडी मात्र निघणार- संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातून संमेलनासाठी प्रतिनिधींची नोंदणी अत्यल्प असली, तरी नांदेडमधून घुमानला भक्तांची दिंडी निघणार आहे. मात्र ही मंडळी स्वतंत्रपणे जाणार असल्याने त्यांची नोंद प्रतिनिधी म्हणून नाही. सुमारे 70 लोक या दिंडीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणीला पुण्यात चांगला प्रतिसाद आहे. मात्र अन्य घटक संस्थांमधून अपेक्षित प्रतिसाद नाही. मुदत वाढवण्याचा विचार सुरू आहे. अनेक लोकांनी अर्ज नेले आहेत. वाढीव मुदतीनंतर हे चित्र पालटेल - डॉ. माधवी वैद्य – अध्यक्ष – साहित्य महामंडळ
ही आहेत का कारणे?
- फक्त तीन दिवसांसाठी पंजाबपर्यंतचा प्रवास टाळण्याची मानसिकता
- घुमान हे गाव असल्याने स्टार हॉटेल्सची वानवा
- संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेतील तोचतोचपणा
- संमेलनाला फक्त उपस्थिती लावून लगेच फिरायला निघण्याची घाई
हे आहेत ‘बोलके’ आकडे, 28 जानेवारीपर्यंतची आकडेवारी
- महाराष्ट्र साहित्य परिषद – 230
- विदर्भ साहित्य संघ – 65
- मराठवाडा साहित्य परिषद – 25
- मुंबई मराठी साहित्य संघ – 20.