आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा ब्रह्मदेवाशी संपर्क आहे का? अामदार बच्चू कडू यांचा सरकारला खाेचक सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणी विदर्भातील अपक्ष अामदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाडनेर (गुजरात) येथील घरापर्यंत काढलेली ‘अासूड यात्रा’ साेमवारी बारामतीत धडकली. कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या विराेधी पक्षांच्या नेत्यांपासून ते सत्ताधारी नेते व मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीकेचा भडिमार केला. ‘दुष्काळात शेतीला ‘शाश्वत पाणी’ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ब्रह्मदेवाशी संपर्क आहे का?’ असा खाेचक सवालही त्यांनी उपस्थित केला.  
 
‘आघाडी सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या माेठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या. मात्र अाता सत्ता गेल्यानंतर हेच लाेक संघर्ष यात्रा काढत अाहेत. आयात-निर्यात धोरण, अर्थसंकल्प, शेतीमालाचे पडणारे भाव तसेच स्वामीनाथन आयोग अापल्या सत्ताकाळात लागू न केल्याची चूक कबूल करून विराेधकांनी खरे तर पाच उठबशा काढून संघर्षयात्रा सुरू करायला हवी हाेती,’ अशी टीकाही कडू यांनी पत्रकार परिषदेत केली.  
 
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले, ‘विराेधी बाकावर असताना शेतीमालासाठी भाव मागणारे देवेंद्र सध्या मुख्यमंत्री आहेत. तरीही  शेतीला वीज, पाणी, खते मिळत नाहीत. हवामान शाश्वत नाही. शेतीमालाला शाश्वत भाव देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे मगच ‘शाश्वत शेती’च्या गप्पा माराव्यात.   

सरकारने फक्त लूट जरी थांबवली तर सरकारचे कर्ज भरण्याची ताकद अामच्या शेतकऱ्यांमध्ये आहे.  शेतकऱ्याला बाजारभावात, काटा मारून जमलं नाही तर ऊसदराच्या हप्त्यात मारायचं हे सरकारी धोरण आहे,’ असा टाेलाही अामदार कडू यांनी लगावला.

.. तर मंत्रालयात बॉम्ब फुटतील  
राजकारण्यांनी माजवलेल्या धर्म, जात, पंथाच्या नावावर दंगली व दुफळीत तरुणाई होरपळली आहे. हा धार्मिक, पक्षीय कट्टरवाद देशाने अनुभवला आहे.  आता शेतकऱ्यांचा कट्टरवाद सुरू होईल. प्रसंगी शहीद भगतसिंगांप्रमाणे मंत्रालयात बॉम्ब फुटतील, असा इशाराही कडू यांनी दिला.  सदाभाऊ खोत भाषण करायला लागल्यावर शेतकरी व संवेदनशील लोकांच्या डोळ्यात पाणी येत असे, मात्र अाता मंत्री झालेले खोत सरकारच्या दावणीला बांधले गेले अाहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यांच्यासोबत राजू शेट्टी किती गुंतलेत ते माहिती नाही, असा टाेलाही कडू यांनी लगावला. 
बातम्या आणखी आहेत...