आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCP आमदार रमेश कदम यांना अटक; अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/ सोलापूर - अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळातील 250 कोटी रुपयांच्‍या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने आज (सोमवार) पुणे येथील हॉटेल ग्रँड हयात येथून मोहळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश कदम यांना अटक केली. कदम हे एका महिन्‍यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. त्‍यांच्‍याविरुद्ध मुंबईच्‍या बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल आहे.

रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महामंडळात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा आरोप विधानसभेत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केला होता. तसेच रमेश कदम यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणीही भाजपच्या सदस्यांनी केली होती. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी अधिवेशन चालू असेपर्यंत चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार कदम यांच्यावर गुन्हा दाखल बोरीवली पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. दरम्‍यान, कदम फरार झाले होते.

3,700 पानी पुरावे
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार केल्‍याचा आरोप आमदार कदम यांच्‍यावर आहे. त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचे माजी मंत्री लक्ष्‍मणराव ढोबळे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात रमेश कदम यांनी 20-25 इनोव्हा महागडी कार पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटल्याचाही आरोप ढोबळे यांनी केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्याला मिळालेली इनोव्हा गाडी परत करायला तयार असल्याचे म्हटले आहे.
एका महिन्‍यापूर्वी बहिणींना घेतले होते ताब्‍यात
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका महिन्‍यापूर्वी आमदार कदम यांची बहीण नकुशा गोविंद कदम (रा. तळजाई वसाहत, धनकवडी,पुणे) यांना पुण्यातून तर लक्ष्मी महादू लोखंडे यांना सोलापूरच्या पथकाने अकलूज येथून ताब्यात घेतले होते.