अहमदनगर- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज दुपारी एकच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावात जाऊन पीडित दलित जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. राज ठाकरे हे एक ते दोन असे तासभर जवखेडेत थांबले होते. यावेळी राज यांनी जाधव कुटुंबियांशी संवाद साधला. तसेच यामागे कोणाचा हात असू शकतो याची विचारपूस केली. सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर राज यांनी जाधव कुटुंबियांच्या मागे मनसे ठामपणे उभी राहील असे सांगत तेथून नगरकडे प्रयाण केले. याचबरोबर मनसेच्या वतीने राज यांनी जाधव कुटुंबियांना 1 लाख रूपयांची मदत जाहीर केली.
नगरमध्ये आल्यानंतर राज ठाकरेंनी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली. विधानसभेतील दारूण पराभवानंतर राज प्रथमच माध्यमांसमोर आले. राज म्हणाले, जवखेडेतील दलित हत्याकांड दुर्देवी आहे. या हत्याकांडाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अथवा फोन चर्चा करून यात लक्ष लागण्यास विनंती करणार आहे. राज्यात अशा प्रकारचे पुन्हा कधीही हल्ले होणार नाहीत व अशी करण्याची हिंमत होणार नाही अशी कठोर शिक्षा केली पाहिजे, असे राज यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या शपथविधीला का गेला नाही असे पत्रकारांनी राज यांना विचारले असता राज म्हणाले, मी फडणवीस यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली म्हणजेच शुभेच्छा पोहचतात असे काही नाही. फडणवीस हे एक चांगले गृहस्थ असून ते चांगले काम करतील अशी मला आशा आहे. टोलबाबत छेडले असता राज म्हणाले, टोल वसुलीला
आपला कधीही विरोध नव्हता. टोल ज्या पद्धतीने वसूल केला जातो त्याला आपला विरोध आहे. टोल वसुलीचे काम कंत्राटदाराकडे न ठेवता सरकारकडे असावे व सरकारच्या तिजोरीत रोजच्या रोज पैसा जमा व्हावा असे मला वाटते. या रक्कमेतून सरकारने कंत्राटदाराचे पैसे भागावावेत अशी आपली भूमिका असल्याचे राज यांनी सांगितले.
जवखेडे खालसा या गावातील दलित जाधव कुटुंबातील आई, वडील व मुलगा अशा तिघांची हत्या करून मृतदेहांचे तुकडे करून विहिरीत फेकण्यात आले होते. ही घटना सोमवारी रात्री घडली. संजय जगन्नाथ जाधव (45), जयश्री संजय जाधव (42) व सुनील संजय जाधव (19) अशी त्यांची नावे आहेत. बाजरीची काढणी करण्यासाठी जाधव कुटुंब मागील आठवड्यापासून जवखेडे खालसाच्या पश्चिमेला तिसगाव-मिरी रस्त्यावरील तांबूळ देवाजवळील शेतात राहायला गेले होते. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून या तिघांची हत्या केली होती. आरोपी माहीतगार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारण दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने जाधव यांच्या वस्तीवरील कुत्र्याला मारले होते. पोलिसांनी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मात्र अद्याप यातून काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. या घटनेनंतर अनेक दलित संघटनांनी व नेत्यांनी जवखेडे खालसा येथे जाऊन भेट घेतली होती व सांत्वन केले होते. राज ठाकरे यांनीही आज जाऊन भेट घेतली.