आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Came At Baramati But Ignore Farmers Question

मोदी- पवार भेट: मोदी आले अन् टाळ्या घेऊन गेले, शेतक-यांच्या प्रश्नांकडे पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील शरद पवार यांना देश-विदेशातून मिळालेल्या वस्तूंच्या संग्रहालयाला भेट देत मोठ्या उत्साहाने पवारांच्या कारकीर्दीची प्रशंसा केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. छाया: हेमंत शिंदे
बारामती - बारामतीची कृषी प्रगती पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आले. शेतकरी मेळाव्यापुढे भाषण करून भरपूर टाळ्याही वसूल केल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शेतीच्या प्रश्नावर भाष्य करण्याची तसदी मात्र ना पंतप्रधानांनी घेतली ना कृषिमंत्र्यांनी. महाराष्ट्राच्या कृषी समस्यांवर सोमवारी (१६ फेब्रुवारी) मुंबईत केंद्र आणि राज्याची सामाईक बैठक घेण्याचे आश्वासन मात्र राधामोहन सिंह यांनी दिले.
पाणी बचतीचे महत्त्व, गरिबी निर्मूलनात शेतीचे योगदान, आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवर मोदी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या भाषणाचा वेळ पंतप्रधानांची स्तुती करण्यात आणि पवारांनी बोलावल्याबद्दलचे आभार मानण्यात संपला. त्यामुळे भेडसावणा-या प्रश्नांची कोणतीच उत्तरे जमलेल्या सुमारे दहा हजार शेतक-यांना मिळाली नाहीत. मोदींच्या वक्तृत्वकलेचा आनंद घेऊनच त्यांना परतावे लागले. प्रसंग होता शनिवारी बारामतीत झालेल्या शेतकरी मेळाव्याचा. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातला ऊस उत्पादक, दूध उत्पादक दुःखी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'एफआरपी मिळत नसल्याने ऊस उत्पादक त्रस्त आहेत, तर दुधाचे भाव २३ रुपये लिटरवरून १८ रुपयांपर्यंत घसरल्याने दूध उत्पादक चिंतेत आहे. अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे दिलेल्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय व्हावेत.' धनगरांना आरक्षण देण्यासंदर्भातही फडणवीस सरकारने केंद्राला शिफारस केली आहे. हा निर्णय संसदेतच होऊ शकतो. या प्रश्नावर मोदींना पूर्ण सहकार्य असेल, असेही पवारांनी सांगितले.फडणवीस यांनीही दुष्काळी महाराष्ट्राचे चित्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांपुढे सविस्तर मांडले. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान मोदी यांनी मात्र त्यांच्या भाषणात पवार आणि मुख्यमंत्री यांच्या मागण्यांचा संदर्भही घेतला नाही. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास राज्यपाल विद्यासागर राव, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रतिष्ठानचे संचालक राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.
पुढे वाचा, पुरणपोळीवर ताव