आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Govt Is Promoting Brahmanism, Says Arundhati Roy

फॅसिझममुळे देशाचे वैचारिक कुपोषण - लेखिका अरुंधती रॉय यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फॅसीझमच्या विरोधात राजकीय आघाड्या करणे अत्यावश्यक बनले आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार नसेल तर आपण वैचारिक कुपोषणाने ग्रस्त असलेले मुर्खांचे राष्ट्र होऊ. देशात पसरणाऱ्या मूर्खतेच्या या विषाणूची किंमत केवळ अल्पसंख्याकांनाच नव्हे तर आपल्यातल्या प्रत्येकाला आणि त्यांच्या मुलाबाळांना चुकवावी लागेल,” अशी भीती आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. “सध्याच्या राजकीय वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा म्हणूनच चुकीचा आहे,” अशी टीका त्यांनी केली. महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रा. हरी नरके, परीषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे आदी या वेळी उपस्थित होते. जोतिराव फुले यांच्या १ २५ व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रॉय म्हणाल्या, डॉ. आंबेडकरांसारखे लिहिण्याचे धाडस आज कोणताही लेखक करू शकत नाही. कधी कुठून गोळी येईल याची शाश्वती राहिलेली नाही. जे काही म्हटले जाते त्याच्याशी सहमत आहोत की नाही हा प्रश्नच नाही. पण आधी मोकळेपणाने बोलता तरी यायला हवे. मी येथे लेखक म्हणून उभी आहे. मला स्वतःशिवाय कोणाचेही प्रतिनिधित्त्व करायचे नाही. ज्यांचा आवाज दडपला जातो त्यांच्या वतीने बोलणे हे कोणाचेही काम नाही. ते स्वतःसाठी बोलू शकतील, यासाठी लढा देणे हे सर्वांचे काम आहे. अशावेळी लेखकांना जगाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. आजकाल यासाठी मृत्यूची किंमत द्यावी लागते.
‘अभाविप’चा गोंधळ; छगन भुजबळांची टीका
अरुंधती रॉय यांना पुरस्कार द्यायला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला. या विरोधाचे निवेदन आयोजकांनी स्वीकारल्यानंतरही पुरस्कार दिला जात असताना ‘अभाविप’ने गोंधळ घातला. पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद देत या गोंधळी कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून हाकलून काढले. ‘अभाविप’चा समाचार घेताना भुजबळ म्हणाले, “हा कार्यक्रम रॉय यांचा नसून जोतिरावांच्या १२५ व्या पुण्यतिथीचा होता. मात्र फुले-आंबेडकरांची स्मारके उभी करणाऱ्यांची नियतच ‘मुंह मे राम बगल में छुरी’ अशी आहे.”
"भारतरत्न'पेक्षा "महात्मा' मोठा
“जोतीराव फुले यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या भावनेची मी कदर करतो. परंतु फुले-आंबेडकरांना दत्तक घेतल्याप्रमाणे करायचे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली द्यायची हे चालू देता कामा नये. मुळात या देशात फुले आणि गांधी हे दोनच ‘महात्मा’ होऊन गेले. ‘भारतरत्न’ चिकार आहेत. डॉ. बाबासाहेबांनासुद्धा तिथून काढून आता ‘विश्वरत्न’ करायला हवे,” असे भुजबळ म्हणाले.