पुणे - केंद्रीय सत्ता फक्त मोदी यांच्या हाती एकवटली आहे. विकासापेक्षाही जातीय मुद्द्यावरून भाजप भावनिक राजकारण खेळत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी शनिवारी पुण्यात केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. केंद्रात मोदी यांच्याशिवाय कोणताही छोटा निर्णयही होऊ शकत नाही. हे सत्तेचे केंद्रीकरण आहे. देशाच्या सरकारची अशी दिशा योग्य नव्हे. त्यामुळे विकासापेक्षा जातीयतेच्या भावनिक राजकारणाला अग्रस्थान मिळत असून मोदी यांची या प्रकाराला मूकसंमती असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असेही अन्वर म्हणाले.
केंद्रातील सत्तेच्या मूल्यमापनासाठी शंभर दिवस पुरेसे नाहीत, हे खरे आहे, मात्र जी स्वप्ने दाखवून मोदी यांनी सत्ता हस्तगत केली त्यांच्या पूर्ततेसाठी नेमकी कोणती पावले उचलली गेली, याचे मूल्यमापन शंभर दिवसांत नक्कीच होऊ शकते, असा सूचक उल्लेख करत अन्वर म्हणाले, लोकसभेनंतर झालेल्या चार राज्यांतील निवडणुकांतील निकालांवरून मोदी सरकारवर लोकांचा विश्वास नाही, हे दिसून आले आहे.
लव्ह जिहादसारख्या जातीय भावनिक मुद्द्यांवरून राजकारण करण्यात येत आहे. मुजफ्फरनगरसारख्या दंगलीसंदर्भात योगी आदित्यनाथ तसेच
अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानांना मोदी यांची मूकसंमती आहे, असेच दिसत आहे.
राज्यात आघाडी सरकार गेली १५ वर्षे सत्तेत आहे. मात्र, या दीर्घकाळात जनतेच्या अपेक्षांची पूर्ती झाली आहे, असे म्हणता येणार नाही, या वास्तवाकडे अन्वर यांनी लक्ष वेधले. पण सरकारने या काळात केलेली विकासकामे जनतेपर्यंत थेट पोहोचली तर पुन्हा एकदा विजय मिळवण्याची संधी आहे, असा विश्वासही अन्वर यांनी व्यक्त केला. लोकसभेतील भाजपचे यश हे उत्तम मार्केटिंगचे यश होते. प्रत्यक्षात भाजप आणि आमच्या आघाडीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फारसे अंतर नाही, याचाही उल्लेख अन्वर यांनी केला.
भाजपच्या अपयशाचे मुद्दे
- शंभर दिवसांत देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही
- महागाई कमी झालेली नाही
- रेल्वेच्या प्रवासी भाड्यातील वाढ अन्यायकारक
- संरक्षण अर्थ ही खाती एकाच व्यक्तीकडे
- मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती नाही
- राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना नाही
- २४ तास कृषी वाहिनीची फक्त घोषणाच