आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Very Charmfull Leadership, Wide Quality Kannad Writer Bhairppa

मोदींकडेच नेतृत्वक्षमता, व्यापक गुण - कन्नड लेखक भैरप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘देशाच्या प्रगतीसाठी नेतृत्वक्षमता, व्यापक दृष्टी आणि विचार असणारा नेता हवा आहे आणि हे गुण नरेंद्र मोदी यांच्यापाशी आहेत’, असे म्हणत ज्येष्ठ कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांनीही बुधवारी लता मंगेशकर यांच्या सुरात सूर मिसळला आहे. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना निवडक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
‘मोदींपाशी उत्तम नेतृत्वगुण आहेत आणि देशहितासाठीचा व्यापक विचारही आहे. राजकारणात लोकशाही पाळली जात नाही. फक्त ठराविक मंडळी राजकारण करतात अणि निवडणुका फक्त नावापुरत्या असतात’, अशी टीकाही त्यांनी केली.
अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्य हे लेखकांचे शस्त्र असते, पण त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न शासन स्तरावर केला जातो. मूठभर लोक काहीतरी हेतू ठेवून असली कामे करत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय देशाची प्रगती कशी होणार? याच हेतूने सलमान रश्दी यांच्यावरील बंदी अयोग्य होती, असे मत असल्याचे भैरप्पा म्हणाले. अन्य धर्मांच्या तुलनेत विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हिंदू धर्मात अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘द. रा. बेंद्रे हे नि:संशय श्रेष्ठ साहित्यिक आहेत, त्यांना मराठी वा कन्नड लेखक म्हणणे, याने त्यांच्या श्रेष्ठत्वाला काहीच बाधा पोचत नाही’, असे भैरप्पा यांनी गिरीश कर्नाड यांच्या वक्तव्याविषयी सांगितले.
सत्यशोधक भूमिकेतून लिहितो
‘कला, विज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म यांचे मूळ सत्यशोधनातच आहे. मी सत्याचा शोध घेण्याच्या भूमिकेतूनच लिहितो. मात्र तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचून हा शोध घेता येत नाही. त्यासाठी ज्ञानपरंपरा, विचारपद्धती, विरोधाभास आणि निसर्गदत्त प्रतिभा यांचा मेळ जमून यावा लागतो,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.