आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक: मोदींचे स्वप्न ‘272 प्लस’; महाराष्ट्रातून ‘15 प्लस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून पंधरापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील दोनदिवसीय शिबिरात नक्की झाली. भाजपचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर ‘272 प्लस’चे स्वप्न पाहिले असून महाराष्ट्रातून त्यांना पंधरापेक्षा जास्त जागा अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.


अटलबिहारी वाजपेयी यांचे सर्वसमावेशक नेतृत्व असताना आणि प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडेंची जोडगोळी पूर्ण भरात असतानाही जे यश भाजपला राज्यात मिळवता आले नाही त्याहीपेक्षा पुढची मजल कशी गाठायची याबद्दलचे मार्गदर्शन राज्यभरातून आलेल्या भाजपच्या ६६६ पदाधिका-यांना गेल्या दोन दिवसांत केले गेले. सध्या भाजपचे महाराष्ट्रात ९ खासदार आहेत. 2004 आणि 1999 च्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने प्रत्येकी तेरा जागा जिंकल्या होत्या.


युतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार लोकसभेच्या 26 जागा भाजपच्या वाट्याला, तर 22 जागा शिवसेनेच्या वाट्याला येतात. रामदास आठवले यांच्या रूपाने तिसरा मित्र जोडल्याने युतीला येत्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठीही जागा सोडाव्या लागणार आहेत. आठवले यांनी पाचपेक्षा अधिक जागांची मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘आठवले यांना कोणते मतदारसंघ द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही. त्यांना हवे असलेले मतदारसंघ युतीच्या सध्याच्या जागावाटपात ज्यांच्याकडे असतील ते पक्ष त्यांच्या कोट्यातील जागा आठवलेंसाठी सोडतील. परंतु महायुतीची जागावाटपाची चर्चा अजून झालेली नाही.’


या जागांवर लक्ष केंद्रित
गेल्या निवडणुकीत भाजपचे ९ खासदार विजयी झाले होते. नगर (दिलीप गांधी), बीड (गोपीनाथ मुंडे), जालना (रावसाहेब दानवे), अकोला (संजय धोत्रे), चंद्रपूर (हंसराज अहिर), धुळे (प्रताप सोनवणे), दिंडोरी (हरिश्चंद्र चव्हाण),जळगाव (ए. टी. नाना पाटील), रावेर (हरिभाऊ जावळे) या विजयी जागा कायम राखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. याशिवाय गेल्या वेळी तीस हजारांपेक्षा कमी फरकाने गमावलेल्या उत्तर पूर्व-मुंबई (किरीट सोमय्या), उत्तर मुंबई (राम नाईक), पालघर (चिंतामण वनगा) पुणे (अनिल शिरोळे), सुनील गायकवाड (लातूर) अशोक नेते (गडचिरोली-चिमूर) या जागा खेचण्याची तयारी भाजपने केली आहे. या वेळी नितीन गडकरी नागपुरातून लढणार असल्याने ही जागा जिंकण्याचीही आशा भाजपला आहे.


भाजपची रणनीती
प्रत्येक मतदारसंघातील मतदार यादी खास ‘अ‍ॅप्लिेकशन’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या स्मार्ट फोनवर देणार.
राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात सव्वीस ते तीस वयोगटातल्या सुमारे 30-50 हजार तरुणांची नावे अद्याप मतदार यादीत नाहीत. त्यांची नाव नोंदणी करून घेण्यावर भर.


मतदानाला न येणारे, परंतु भाजपला अनुकूल असलेले व कुंपणावरच्या ‘फ्लोटिंग’ मतदारांवर लक्ष केंद्रित .
राज्यात भाजपकडे असलेल्या सर्व मतदारसंघांत गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे मेळावे घेणार.
ऑक्टोबरमध्ये मोदींच्या उपस्थितीत राज्यातल्या दोन लाख बूथ कार्यकर्त्यांचा मुंबईत मेळावा.