आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळे यांनी जेष्ठ समाजसेवक मोहन धारियांना वाहिलेली आदरांजली, वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ नेते आदरणीय मोहन धारीया यांचे निधन झाल्याची बातमी समजली आणि मोठा कालखंड डोळ्यासमोजर उभा राहिला. समाजवादी विचारसरणीने भारावलेला स्वातंत्र्य काळाच्या पिढीतील आणखी एक दुवा निखळला. गेली पाच दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आदरणीय धारीया साहेबांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.
सत्तरीच्या दशकामध्ये देशातील ‘तरुण तुर्क’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नेत्यांमध्ये धारियाजींची विशेष ओळख होती. स्वर्गिय इंदिराजींच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या धारीयाजींनी आणिबाणीच्या कालखंडातील लोकशाहीच्या दमनाला विरोध दर्शवला आणि जनता पक्षाची वाढ झाली. त्यानंतरही केंद्रात मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सदस्य या नात्याने त्यांनी भूमिका बजावली. 80 च्या दशकात राजकीय जीवनातून हळूहळू बाजूला होऊन त्यांनी पर्यावरणासारख्या महत्वाच्या विषयात स्वतःला झोकून दिले आणि वनराईसारखी संस्था आकारास आली. त्याच्यातून अक्षरशः जलसंधारण, मृदूसंधारण आणि पर्यावरणसंवर्धनाची हजारो कामे उभी राहिली.
सत्तेच्या आणि पक्षीय वर्तुळाच्या पलिकडे जाऊन व्यापक स्तरावर हा विषय त्यांनी हाताळला. राज्यातील आणि देशातील स्वयंसेवी संस्थांच्या चळवळीला त्यांच्या रुपाने एक दमदार नेतृत्व लाभले. राजकीय जीवनातील महत्वाची पदे भूषविलेल्या व्यक्तीने आयुष्याच्या अखेरीस एखादा विषय हाती घेऊन विशेष योगदान कसे देता येईल याचे आदर्श उदाहरण त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहे. त्यांच्या कार्यासाठी स्थानिक पातळी पासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पुरस्कार देऊन समाजाने याची नोंद घेतली याचे मला समाधान वाटते. आदरणीय पवार साहेबांचे एक ज्येष्ठ मित्र व सहकारी म्हणून मला त्यांना अनेक वर्षे जवळून पाहता आले. अतिशय संयत मृदू तरीदेखील एक ठाम विचार आणि ठोस धोरण घेऊन त्यांनी आपली सामाजिक-राजकीय जीवनाची वाटचाल केल्याचे मी पाहिले आहे. त्यांच्या स्मृतीस माझी विनम्र आदरांजली.