पुणे- महापुरुषांबद्दल
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर आल्यानंतर हडपसर येथे तणाव निर्माण होऊन त्यात आयटी अभियंता मोहसीन सादिक शेख (वय 28, रा.सोलापूर) याची एका टोळक्याने हत्या केली होती. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला हडपसर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून अटक केली.
आक्षेपार्ह पत्रके वाटल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीसांनी यापूर्वी देसाई याला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला शेख याचे खुनाचे गुन्ह्यात अटक करण्यासाठी मंगळवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेतले. कलम 302 व 120 (बी) हे गुन्हे त्याचेवर लावण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून बुधवारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत सदर प्रकरणात एकूण 20 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
कोण आहे धनंजय देसाई ?
देसाई हा मुळचा मुंबईचा असून काही वर्षांपूर्वी तो पुण्यात स्थायिक झाला आहे. त्याचेवर पुणे व मुंबई परिसरात एकूण 22 गुन्हे दाखल असून त्यातील तीन गुन्हे खंडणीचे आहेत. अभिनेता संजय दत्त विरोधातील त्याच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व परिसरात गोंधळ घातला होता. देसाई व त्याचे संस्थेवर बंदीसाठी पोलीस केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करत आहे.